सर्वसामान्य, कष्टकरी जनतेचा आवाज हरपला

। कोल्हापूर । विशेष प्रतिनिधी ।
गेली सात दशकाहून अधिक काळ राज्यातील शेतकरी,कष्टकरी जनतेच्या हितासाठी रस्त्यावर उतरुण संघर्ष करणारे,ज्येष्ठ विचारवंत,माजी सहकार मंत्री शेकाप नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील (वय 93) यांचे कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात सोमवारी (17 जानेवारी) निधन झाले.त्यांच्या निधनाने सर्वसामान्य, कष्टकरी जनतेचा आधारवडच कोसळला आहे.
.पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार, शेकाप सरचिटणीस आम.जयंत पाटील,पालकमंत्री सतेज पाटील,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आदींसह राजकीय, सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी एनडींच्या निधनाबद्दल शोक प्रकट केला आहे.त्यांच्या पश्‍चात पत्नी सरोज पाटील,मुलगा असा परिवार आहे.
वातावरणातील बदलामुळे एन. डी. पाटील यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना दोन दिवसांपूर्वी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. तिथं उपचारादरम्यान त्यांना दोन ब्रेन स्ट्रोक येऊन गेले. त्यामुळे त्यांचे बोलणेही बंद झाले होते. मागच्या दोन चार दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नपाणी देखील गेलेले नव्हते. ते उपचारासही फारसा प्रतिसाद देत नव्हते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, त्याला यश आलं नाही.
अलिकडचा काळ सोडला तर एनडी नेहमीच सक्रिय राहिलेले आहेत.राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात ते अखेरपर्यंत कार्यरत राहिले होते.
अंत्ययात्रा निघणार नाही
एन.डी. पाटील यांच्या पार्थिवावर (18 जानेवारी) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. करोनाच्या नियमांमुळे अंत्ययात्रा निघणार नाही. राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या (कदमवाडी रोड, सदरबाजार ) मैदानावर सकाळी 8 ते 2 या वेळेत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आह तसेच एन.डी.पाटील समाजवादी प्रबोधिनीचे व अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन व विवेकवादी चळवळीचे अग्रणी असल्याने कोणत्याही कर्मकांडाशिवाय त्यांचा अंत्यविधी होणार आहे. करोनाच्या नियमांमुळे केवळ 20 जणांच्या अर्थात कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यविधी होणार आहे. तरी कार्यकर्त्यांनी शाहू कॉलेजवर अंत्यदर्शनासाठी यावे मात्र अंत्यविधीच्या ठिकाणी गर्दी करू नये तसेच मास्क, फिजिकल डिस्टनसिंग आणि महाविद्यालय परिसरात पार्किंग नियमांचे पालन करावे, असे आवाहन एन.डी. पाटील यांच्या पत्नी सरोजताई उर्फ माई पाटील व कुटुंबियांनी केले आहे.

Exit mobile version