। सायली पाटील । अलिबाग ।
कलाकारांची पर्वणी लाभलेल्या अलिबाग नगरीत विविध स्पर्धा होत असतात. अभिनय, नृत्य, गायन, कविता अशा अनेक स्पर्धांनंतर अलिबागमध्ये पहिल्यांदाच सिंगिंग स्टार्स कराओके आयोजित द व्हॉईस ऑफ अलिबाग ही गायन स्पर्धा सोमवारी (दि.30) पीएनपी नाट्यगृह अलिबाग येथे दिमाखदारपणे संपन्न झाली.
कलाकार आणि कलागुणांची आरास असलेल्या अलिबाग तालुक्यात काही वर्षांपूर्वी कमी भासत होती ती फक्त आणि फक्त उपलब्ध होणार्या संधीची. पण, हळूहळू अनेक स्पर्धा सुरू झाल्या आणि कलाकारांना वाव मिळाला. त्यातच सिंगिंग स्टार्स कराओके स्टुडिओचे संचालक राजेंद्र बोराडे व आशा बोराडे तसेच अभिषेक बोराडे यांनी अलिबागमधील संगीत क्षेत्रातील आवड असणार्या लोकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. अंतिम फेरीचे परीक्षण संदीप शहा, अॅड.कला पाटील, विक्रांत वार्डे यांनी केले.
स्पर्धेसाठी अलिबाग तालुक्यातील 90 स्पर्धकांनी नोंदणी केली होती. स्पर्धेची 22 मे रोजी पहिली तर 28 मे रोजी दुसरी फेरी पार पडली. या दोन्ही फेर्यांमध्ये बाजी मारत 29 स्पर्धकांनी यशस्वीरित्या अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम फेरी अतिशय चुरशीची झाली. प्रत्येक स्पर्धकाने केलेली मेहनत त्यांच्या सादरीकरणातून दिसत होती. सुरमई, खामोशिया, यम्मा यम्मा अशा एक ना अनेक बहारदार गाण्यांनी प्रेक्षकांना अगदी भारावून सोडले. स्पर्धकांचे सादरीकरण सुरू असताना त्यांच्यासोबतच गाणी गुणगुणत प्रेक्षकांनी ठेका धरला होता. संपूर्ण अलिबाग तालुक्यातील ही सर्वात मोठी गायन स्पर्धा असल्याने रसिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
द व्हॉईस ऑफ अलिबाग या स्पर्धेच्या पहिल्या पर्वाचा विनय नरेश नेवारेकर हा व्हॉईस ऑफ अलिबाग ठरला. तसेच या स्पर्धेत 15 ते 35 या प्रथम गटात विनय नरेश नेवारेकर प्रथम क्रमांक, शलाका विनय चन्द्र पंडित द्वितीय क्रमांक, पियुष प्रदीप पाटील तृतीय क्रमांक तर, 36 ते 55 या द्वितीय गटात प्रतीक प्रमोद केळकर प्रथम क्रमांक, प्रदीप आत्माराम पाटील द्वितीय क्रमांक, जस्टीन रोड्रिक्स तृतीय क्रमांक पटकाविला. ग्रुप सी मध्ये सतीश पानसरे प्रथम क्रमांक, आशिष शेटे द्वितीय क्रमांक, प्रदीप शेळके तृतीय क्रमांक तर, ग्रुप डी मध्ये संतोष लासे आणि गणेश पावसकर प्रथम क्रमांक, सतीश पानसरे समिधा कार्लेकर द्वितीय क्रमांक, पंकज जाधव व शलाका पंडित तृतीय क्रमांक यांनी बक्षिसे पटकावली.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह व शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील उपस्थित होत्या. तसेच याप्रसंगी माजी जि.प सदस्या प्रियदर्शनी पाटील, माजी जि.प सदस्या संजय पाटील, यतीन घरत, ज्येष्ठ अभिनेते राजन पांचाळ, माजी उपसरपंच चेंढरे अॅड.परेश देशमुख, रायगड टाईम्स उपसंपादक महेश पोरे आदि अतिथी म्हणून उपस्थित होते. सिंगिंग स्टार्स कराओकेच्या सर्व सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मेहनत घेतली.
तसेच याप्रसंगी अलिबागमधील दिग्गज गायक योगेश आग्रावकर, विशाल अभंगे, महेंद्र पाटील, रोहित पाटील, विक्रांत वार्डे यांनी आपली उपस्थिती लावून आपली कला प्रेक्षकांसमोर सादर करत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
अलिबागमध्ये अनेक कलाकार आहेत. परंतु त्यांना संधीची कमी आहे. त्यामुळे बोराडे दाम्पत्याने सिंगिंग स्टार्स कराओकेच्या माध्यमातून द व्हॉईस ऑफ अलिबाग ही भव्यदिव्य संधी उपलब्ध करून दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले त्याबद्दल त्यांचे कौतुक तसेच विजेत्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. शेकापने उभारलेल्या पीएनपी नाट्यगृहाच्या उद्दिष्टाचे सार्थक झाले. या स्पर्धेमुळे नवे आवाज, चेहरे समोर आले. पीएनपी नाट्यगृहाने आजवर अनेक कलाकार घडवले आहेत. भविष्यातही अनेक कलाकारांना पीएनपी नाट्यगृह संधी देईल
चित्रलेखा पाटील, पीएनपी एज्युकेशन सोसायटी कार्यवाह







