चिवण्यांची प्रतीक्षा संपली

खवय्यांमध्ये आनंदाचे वातावरण

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

पावसाळ्यात खाडीकिनारी चिवणी मासे मोठ्या प्रमाणात मिळू लागले आहेत. चिवण्या बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याने खवय्ये आनंदी झाले आहेत. मात्र, तरी हंगामाची सुरुवात असल्याने चिवण्या महाग मिळत आहेत. सध्या 400 रुपये किलो मिळत आहेत. विविध ठिकाणी हे भाव कमी-अधिक आहेत. खाडीच्या मुखाच्या भागात चिवण्या अधिक प्रमाणात सापडतात. मात्र, खाडीकिनारी प्रदूषित झाल्याने चिवण्यांचे प्रमाण घटले आहे. तरीसुद्धा पावसाळ्यात चिवणी मासे मुबलक मिळतात.

खाडीकिनारी गोड्या पाण्यात हे मासे अंडी घालतात. पावसाच्या सुरुवातीला गाबोळी म्हणजेच पोटात अंडी असलेल्या चिवण्या अधिक सापडतात. अशा वेळी मासेमार व स्थानिक मोठ्या प्रमाणात चिवण्या पकडतात. सध्या या चिवणी माशांची आवक अलिबाग, पेण, उरण, पनवेल, पाली, रोहा आदी मासळी बाजारात काही प्रमाणात सुरू झाली आहे.

हंगामातील पहिलेच चिवणी मासे असल्याने मागणी खूप आहे. खवय्ये खरेदीसाठी तुटून पडत आहेत. काही दिवसांनी पाऊस सुरू झाल्यावर आवक वाढल्यानंतर चिवण्या स्वस्त होतील. या माशांच्या अंड्यांना मोठी मागणी असते.

गौरी मनोरे, मासळी विक्रेत्या, पेण-पाली

चिवणी मासे खूप चविष्ट असतात. या मोसमात मिळणारे चिवणी मासे आवर्जून खातो. स्वतः जाळे घेऊन मासे पकडायला जातो. वलगणीत देखील सापडतात. तळून किंवा कालवण करून हे मासे खाल्ले जातात.

ॲड. राकेश पाटील, खवय्ये, अलिबाग
वैशिष्ट्ययपूर्ण शारीरिक रचना
चिवणीची त्वचा अतिशय चिकट व तेलकट असते. त्यामुळे तो हातात धरताना सटकतो. या माशाच्या डोक्याजवळ टणक अणकुचीदार काटा असतो. त्यामुळे मासा सांभाळून पकडावा लागतो. त्याचा काटा टोचल्यास इजा होते.
साफ करण्याची कला
हा मासा साफ करण्यासाठी चुलीतील राख वापरतात. ती नसेल तर तांदळाचे पीठ वापरतात. डोक्याजवळील काटा हातात राखाडी घेऊन मोडावा लागतो. काहीजण तो सुरी किंवा विळीने कापून टाकतात.
Exit mobile version