कळंबोलीतील नागरिकांची प्रतीक्षा संपली

रविंद्र भगत यांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश

| पनवेल | वार्ताहर |

गेल्या अनेक वर्षांपासून कळंबोली येथील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी तत्कालीन कळंबोली सरपंच आणि माजी नगरसेवक रविंद्र भगत यांच्या लढ्याला यश मिळाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कळंबोली येथील नागरिकांच्या मुलभूत सुविधा असलेल्या पाणी, रस्ते, गटारे आदी कामांचे भूमिपूजन शिवजयंतीच्या मुहूर्तावर सोमवारी (दि.19) पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते पार पडले.

रविंद्र भगत यांनी कळंबोली येथील नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी सिडको प्रशासन, नंतर महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पालिका आयुक्तांकडे अनेक योजनांची मागणी केली होती. पनवेल महापालिका क्षेत्रात गेल्या 6 वर्षात 3 आयुक्त नेमले गेले, यामध्ये गणेश देशमुख हे दुसऱ्यांदा आयुक्त म्हणून पनवेलसाठी लाभले. सत्ताधारी आणि विरोधक यांच्या भांडणामध्ये पनवेलचा विकास कुठेतरी मागे पडत चालला होता. मात्र, नगरसेवकांची मुदत संपल्यानंतर पालिका आयुक्त प्रशासक म्हणून काम पाहू लागले आणि पनवेलच्या विकासाचे अनेक प्रलंबित विषय मार्गी लागले.

कळंबोली येथील नागरिकांच्या हक्काच्या सुविधा मिळविण्यासाठी रविंद्र भगत यांना दोनवेळा बेमुदत उपोषण देखील करावे लागले होते. मात्र, सत्ताधारी आणि विरोधक यांच्या लढ्यामध्ये पनवेलमधील खुंटलेला विकास पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी मार्गी लावला. पालिका हद्दीमध्ये समाविष्ट झालेल्या 29 गावातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी पावले उचलली आहेत. यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, नवीन पाईप लाईन टाकण्याचे काम, सेव्हर लाईन, रस्ते तसेच आरसीसी गटारे बांधणे आणि तलावांचे सुशोभीकरण करण्याच्या कामांना त्यांनी गती दिली आहे.

या कामांची सुरुवात पालिका आयुक्तांनी शिवजयंतीच्या मुहूर्तावर कळंबोली येथील केली. यावेळी त्यांनी अमृत योजनेअंतर्गत कळंबोली गावातील जलकुंभ उभारण्याचे भूमिपूजन, कळंबोली गावातील पाण्याच्या तळाशी नवीन पाईप लाईनचे भूमिपूजन, सेव्हर लाईन भूमिपूजन, रस्त्यांचे भूमिपूजन आणि आरसीसी गटर लाईनचे भूमिपूजन करून पनवेलच्या विकासाला गती दिली आहे. यावेळी माजी नगरसेवक रविंद्र भगत यांनी केलेल्या पाठपुराव्याला आणि त्यांच्या लढ्याला आयुक्त गणेश देशमुख यांनी न्याय देण्याचे काम केले असून महापालिकेत समाविष्ट झालेल्या 29 गावांचा कायापालट करण्यासाठी देखील त्यांनी नव्या निविदा काढल्याचे समोर आले आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावर अनेक विकासकामांचे भूमिपूजन करून त्यांनी कळंबोलीतील नागरिकांना शिवमय शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version