राजमळा पुलाचे कठडे नादुरुस्त
। अलिबाग । प्रतिनिधी ।
अलिबाग विधानसभा मतदार संघाचे आमदार असलेल्या महेंद्र दळवी यांना आपल्याच गावातील राजमळा येथील डळमळीत झालेल्या पुलाची दुरुस्ती करता आली नसल्याबद्दल ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या पुलाच्या दोन्ही बाजुकडील कठडे नादुरुस्त झाले आहेत. पुलाच्या दुरुस्तीबाबत प्रशासन देखील उदासिन असल्याची चर्चा जोरात रंगत आहे.
अलिबाग शहर पर्यटन व शैक्षणिक, सामाजिक दृष्टीने महत्वाचा ठरत असताना मांडवा व रेवस बंदरदेखील नावारुपाला येऊ लागला आहे. या बंदरावर वेगवेगळ्या सोयीसुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सागरी मार्गाने वाहतूक करणार्या प्रवाशांसह पर्यटकांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी या ठिकाणी वेगवेगळे मॉलची निर्मिती होऊ लागली आहे. त्यात मांडवा बंदरावर रो-रो, पीएनपी, अंजठा, मालदार सारख्या खासगी बोटींद्वारे प्रवाशांना चांगली सेवा दिली जात आहे. तसेच रेवस बंदरावरून देखील करंजा, भाऊचा धक्का येथे प्रवासी फेरी बोटीची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे मुंबईहून अलिबागकडे येणार्या पर्यटकांची संंख्या वाढत आहे.
अलिबाग – रेवस मार्गावरील रस्ता चांगला झाला आहे. मात्र या रस्त्यावरील पुलांच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे समोर आले आहे. अलिबाग – रेवस मार्गावरील राजमळा पुलाची अवस्था बिकट झाली आहे. सुमारे 20 वर्षापेक्षा जुना असलेल्या पुलाच्या दोन्ही कठड्यांच्या बाजुला झुडपांनी विळखा घातला आहे. दोन्ही कठडे तुटलेले आहेत.या नादुरुस्त कठड्यांकडे सार्वजनिक बांधकाम विभाग बघ्याची भुमिका घेत असल्याने प्रवासी व पादचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर होऊ लागला आहे. रेवस – अलिबाग मार्गावरून वाहनांची सतत वर्दळ असते. या पुलावरून हजारो वाहनांची ये- जा असते. नादुरुस्त पुलाचा परिणाम अपघात वाहतूकीवर होण्याची भिती आहे.
वेगवेगळया विकास कामांची जाहीरात बाजी करून विद्यमान आमदार विकास कामांचा श्रेय मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा रंगत असताना त्यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या या जीर्ण पुलाच्या दुरुस्तीबाबत ते उदासीन का आहेत, असा प्रश्न येणार्या जाणार्या प्रवाशांकडून सातत्याने केला जात आहे. नादुरुस्त पुलाच्या या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.