प्रवाशांची पाण्यासाठी फरफट
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल एस.टी. बस डेपोमध्ये नागरिकांसाठी असलेली पाणपोई गेल्या एक महिन्यापासून बंद अवस्थेत असून, याचा मोठा फटका प्रवासीवर्गाला बसत आहे. डेपोतील पाण्याच्या पंपाला जोडलेल्या वीज लाईन्स खराब झाल्यामुळे पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. परिणामी, रोज शेकडो प्रवाशांना पिण्याचे पाणी विकत घेऊन तहान भागवावी लागत आहे.
उन्हाळ्याची सुरुवात झाली असताना पाणपोई बंद राहणे ही गंभीर बाब असून, ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, मागील वेळी परिवहन सेवेचे मंत्री पनवेल दौऱ्यावर आले असताना पाणपोई सुरू होती, मात्र त्यानंतर पुन्हा दुर्लक्ष झाले आहे. प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून पाणपोई सुरू करावी, अशी मागणी संतप्त प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
पनवेल एस.टी. बस डेपो हा कोकण, पुणे, मुंबई तसेच नवी मुंबईकडे जाणाऱ्या हजारो प्रवाशांचा प्रमुख केंद्रबिंदू आहे. दररोज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करत असतात. अशा ठिकाणी मूलभूत सुविधा असलेली पाणपोई बंद राहणे हे एस.टी. प्रशासनाच्या दुर्लक्षाचे स्पष्ट उदाहरण मानले जात आहे.
प्रवाशांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात आलेली नसल्याचे चित्र आहे. काही प्रवाशांनी खासगी पाणी विक्रेत्यांकडून महागडे बाटलीबंद पाणी खरेदी करण्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. उन्हाळ्यात उष्णतेचा पारा वाढत असताना पिण्याच्या पाण्याअभावी प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एस.टी. महामंडळ व संबंधित विभागाने तातडीने वीज लाईन दुरुस्ती करून पानपोई सुरू करावी, तसेच पर्यायी स्वरूपात पाणी टँकर किंवा तात्पुरती व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी नागरिक व प्रवासी वर्गाकडून होत आहे.







