जामरूंग पाझर तलावाने गाठला तळ

पंपाने पाणी सांडव्यात सोडण्याचा निर्णय

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत तालुक्यातील सोलनपाडा येथे असलेल्या जामरूंग पाझर तलावातील पाणी तळाशी गेल्याने गेली दोन महिने या भागात पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे स्थानिक नळपाणी योजना बंद पडण्याच्या मार्गावर असताना ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेऊन पिण्याचे पाणी सर्वांना मिळावे म्हणून पंप लावून पाझर तलावातील पाणी सांडव्यात सोडण्यात आले. दरम्यान, ग्रामपंचायतीकडून दोन गावांना टँकरने पाणी पुरवावे लागत असल्याने तलावात असलेले पाणी सोडण्याचा निर्णय ग्रामपंचायतीन घेतला.

सोलनपाडा येथे जामरुंग पाझर तलाव म्हणून नोंद असलेल्या तलावातून पाझरून जाणार्‍या पाण्यावर हिरे वाडी, पिंपरकर वाडा, सोलान पाडा, कामत पाडा, डुक्कर पाडा, ठोंबरवाडी, जामरूंग तसेच रजपे ग्रामपंचायतीमधील नळपाणी योजना अवलंबून आहेत. जामरुंग पाझर तलावातील पाणी मार्च महिन्यात आटल्यानंतर विहिरीचे पाणी खाली गेल्याने पाझर तलावाच्या खाली पाणी जाणे बंद झाले. त्यामुळे तलावातील पाणी नदीमध्ये येणे बंद झाले आणि त्यांनतर या पाण्यावर अवलंबून असलेल्या नळपाणी योजना कोलमडून गेल्या. नळपाणी योजना यांच्या विहिरी कोरड्या पडल्याने मागील दोन महिने या भागात मोठी पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली होती. अनेक ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर देखील सुरू केले होते. त्यात ग्रामपंचायतीकडून हिरेवाडी आणि पिंपरकरवाडा या भागात पिण्याच्या पाण्याची दूर करण्यासाठी टँकर सुरू करावे लागले होते.

पाणी टंचाईचे दुर्भिक्ष आणखी वाढल्याने शेवटी जामरूंग ग्रामपंचायतीकडून पाझर तलावातील पाणी पंप लावून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. सरपंच दत्तात्रय पिंपरकर यांनी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाझर तलावातील पाणी विहिरीपर्यंत पाइपलाइन टाकून पाणी कालव्यात सोडण्यात आले. या पाण्यामुळे तेथील चिल्लारनदीची उपनदीमध्ये पाणी साठू लागले असून त्या पाण्यावर अवलंबून असलेल्या नळपाणी योजना यांच्या उद्भव विहिरीत पाणी साठा तयार झाला आहे. मात्र, या पाझर तलावातील पाणी सोडण्याचे नियोजन लघु पाटबंधारे विभागाने आगामी काळात करायला हवे आणि त्यातून पाझर तलावातील पाणी जून महिना सुरू होईपर्यंत विहिरीत राहण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.

Exit mobile version