मोरबे धरणातील पाणी पातळी घटली

15 ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा

| पनवेल । वार्ताहर ।

यंदा नवी मुंबईकरांची तहान भागविणार्‍या मोरबे धरण क्षेत्रात गरजेपेक्षा कमी पावसाची नोंद झाल्याने मोरबी धरण पूर्णपणे भरले नव्हते. दिवसेंदिवस नवी मुंबई शहरातील पाण्याचा वापरही वाढत असून धरण पूर्ण भरले नसल्याने यावेळी अवघे 48.52 टक्के पाणीसाठा असून, 15 ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा मोरबे धरणात उपलब्ध आहे. तेच मागील वर्षी 54 टक्के पाणीसाठा होता. येत्या कालावधीत नवी मुंबई शहरात पाणी कपात होण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.

यंदा जूनमध्ये सुरवातीला पावसाने दमदार हजेरी लावली होती. मात्र पुन्हा पावसाने दडी मारली. त्यानंतर पुन्हा पावसाळा सुरू झाला, मात्र नवी मुंबई शहरात सर्वाधिक पावसाची नोंद झाली, तर मोरबे धरण क्षेत्रात मात्र आवश्यकतेपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे यंदा मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. सन 2021-22 मध्ये मोरबेत 4229 मि.मी पावसाची नोंद झाली, तर सन 2022-23 मध्ये 3571 मिमी पाऊस पडला. स्वतःच्या मालकीचे धरण असलेली जल संपन्न महापालिका अशी ओळख आज नवी मुंबई शहराची आहे. शहरातील नागरिकांना पाणी पुरवठ्यासाठी या धरणातून प्रतिदिवस 488.97 एमएलडी पाणीपुरवठा होतो. नवी मुंबईसह कामोठे व मोरबे परिसरातील 7 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे. हे धरण 88 मीटर पातळीला पूर्ण भरते आणि तेव्हा 190.89 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा होतो.

मागील वर्षी धरण 100 टक्के भरले होते, मात्र यावेळी धरण क्षेत्रात समानधानकारक पाऊस न पडल्याने 95 टक्के धरण भरले होते. सध्यास्थितीला 48.52 टक्के पाणीसाठा असून 92.621 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. नवी मुंबई शहरात पाणी कपातीची शक्यता पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

नवी मुंबई पाणी पुरवठा विभाग
Exit mobile version