अंबा नदीचे पाणी झाले गढूळ

धरणातील पाणी सोडल्याने पात्रात चिखल
नागरिकांचे आरोग्य धोक्यात
। सुधागड -पाली । वार्ताहर ।
अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली शहराला येथील अंबा नदीतून थेट पाणीपुरवठा केला जातो. गुरुवारी (ता.5) अंबा नदीच्या पाण्यात अचानक चिखल व गाळ आल्याने पाणी प्रचंड गढूळ झाले होते. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले. उन्हेरे येथील धरणातील चिखलयुक्त पाणी सोडल्याने अंबा नदीचे पाणी गढूळ झाले होते.
चिखलामुळे अंबा नदीचे पाणी पूर्णपणे मातकट रंगाचे झाले होते. शिवाय असे गढूळ पाणी नळाद्वारे नागरिकांना आले. नळाद्वारे अचानक गढूळ पाणी आल्याने नागरीकांनी चिंता व्यक्त केली. याशिवाय अंबा दिला प्रदूषणाचा विळखा पडला आहे. शहरातील सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ते थेट अंबा नदीपात्रात सोडले जात आहे. येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा कोणताच प्रकल्प पालीत उपलब्ध नाही. तसेच तब्बल 20 कोटींची शुद्धपाणी योजना देखील लालफितीत अडकलेली आहे. परिणामी भाविक व नागरिकांना नाईलाजाने हे गढूळ व प्रदूषित पाणी वापरावे लागत आहे. आत्ता पर्यंत नळाच्या पाण्यातून साप, बेडूक, शंखशिंपले व मासे आदी प्राणी आले आहेत. याबरोबरच शेवाळ व चिखल हे नेहमीच येत असते. आजूबाजूच्या कारखान्यांतून प्रदूषित पाणी देखील अंबा नदीमध्ये सोडले जाते. अनेक नागरिक प्रदूषित पाणी पिण्यापेक्षा कूपनलिका व विहीरीचे पाणी पिण्यावर भर देत आहेत. बहुतांश जण विकतचे बाटलीबंद पाणी पितात. नियमित पाणीपट्टी भरून देखील लोकांना असे प्रदूषित पाणी मिळत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

पाटबंधारे विभागाने बहुतेक उन्हेरे धरणातील पाणी नगरपंचायतीला कोणतीही पूर्वसूचना न देता अंबा नदीमध्ये सोडले आहे. त्यामुळे पाणी गढूळ झाले आहे. पाण्यात नगरपंचायतीद्वारे औषध टाकण्यात आले आहे. तसेच दोनतीन दिवसांत गाळ खाली बसेल. नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे. – सुलतान बेनसेकर, पाणीपुरवठा सभापती, पाली नगरपंचायत

उन्हेरे धरणाची जॅकवेल व तेथील दरवाजाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. हा दरवाजा उघडल्याने धरणातील साठलेला काही गाळ पाण्यामार्फत अंबा नदीला मिळाला आहे. एक दोन दिवसांत हा गाळ खाली बसेल व पाणी स्वच्छ होईल. – राकेश धाकतोडे, कार्यकारी अभियंता, कोलाड पाटबंधारे विभाग

शुद्ध नळपाणी योजना लालफितीत
शासनाने केलेल्या 2008 -09 च्या सर्व्हेनुसार पालीची लोकसंख्या व पालीत दररोज येणार्‍या भाविक व पर्यटकांच्या संख्येनुसार शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेचे नियोजन केले होते. एकूण 7 कोटी 79 लाखाचा निधी व 10 टक्के लोकवर्गणीद्वारा नळयोजना उभी राहणार होती. परंतू राजकीय श्रेयवादामध्ये हि योजना रखडली गेली. त्याबरोबर 10 टक्के लोकवर्गणीचा प्रश्‍न देखिल होता. मात्र पालीला ङ्गफबफफ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाला आहे. तसेच शुद्ध नळपाणी पुरवठा योजनेसाठी 11 कोटी 70 लाख रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. लोकवर्गणीची अट शिथील करण्यात आली आहे. सद्य स्थितीत ही योजना 20 कोटींवर गेली आहे.

Exit mobile version