जयंत पाटील यांनी सागरगड माची येथे नागरिकांशी साधला संवाद
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील सागरगड माची येथील आदिवासीवाडीत निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईची दखल शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी घेत मंगळवारी (दि.3) सकाळी प्रत्यक्ष भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. पाण्याच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन ती लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून, त्यामुळे या वाडीतला पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याची आशा निर्माण झाली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून सागरगड माचीतील आदिवासीवाडी पाणीटंचाईने त्रस्त आहे. यासंदर्भात शेकाप कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांची भेट घेऊन समस्या मांडली होती. त्यानंतर पाटील यांनी थेट आदिवासीवाडीत जाऊन स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या व पाणीपुरवठ्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या भेटीमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी प्रफुल्ल पाटील, संतोष गुरव, विलास वालेकर, नरेश गोंधळी, सागर गुरव, सिध्देश गोंधळी, नामदेव पाटील, उदय वेळे, रवींद्र नाईक, रोहन वालेकर, मोहन नाईक, गजानन नाईक, अर्जुन नाईक, गोविंद नाईक, रतन नाईक, माजी सरपंच रंजना नाईक, सचिन नाईक, आनंद नाईक, देवेंद्र नाईक, अरुण नाईक, राहुल नाईक, अनिता नाईक, चंद्रकांत नाईक आणि अंकुश नाईक आदी उपस्थित होते.





