एक लाख लीटर पाण्याची टाकी बांधण्यास सुरूवात
। रायगड । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील रेवस परिसरात पाणीप्रश्न गंभीर असल्याचे चित्र आहे. योजना आहेत, पण पाणी मिळत नसल्याचा आरोप परिसरातील नागरिक करताना दिसतात. अशा परिस्थितीमध्ये डावली रांजणखार ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामस्थांना सतावणारी पाण्याची समस्या निकाली निघणार आहे. जलजीवन मिशन आणि एमआयडीसीच्या पाणी योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. दुसरीकडे गावात एक लाख लीटर पाणी साठवण करणार्या टाकीच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील, सरपंच हेमंत पाटील यांनी टाकीच्या बांधकामाची पाहणी करून काम गुणवत्तापूर्ण करण्याच्या ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत.
डावली रांजणखार ग्रामपंचायत हद्दीत पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. पदरमोड करून नागरिकांना पाणी आणावे लागत आहे. गावात असणार्या नळांना पाणी येण्याची प्रतीक्षा कायम आहे. पाणी नसल्याने ग्रामपंचायत हद्दीत शासनाच्या धोरणाची अनेकदा नाराजी व्यक्त करणारी आंदोलने ग्रामस्थांनी केली आहेत. यापार्श्वभूमीवर माजी सभापती प्रकाश पाटील, ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंत पाटील आणि डावली रांजणखार ग्रामस्थ खास करून महिला वर्गाने ग्रामपंचायत हद्दीत मुबलक पाणी मिळावे यासाठी शासन दरबारी यशस्वी प्रयत्न केले. यामुळे डावली रांजणखार ग्रामपंचायत हद्दीत जलजीवन मिशन आणि एमआयडीसीमार्फत पाणी योजना राबविण्यासाठी मान्यता मिळाली. या दोन्ही योजनांची पाईपलाईन टाकण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. पाईपलाईनमधून येणारे पाणी साठवण्यासाठी ग्रामस्थांच्या सूचनेनुसार टाकी बांधण्याची जागा निश्चित करण्यात आली आहे. या पाण्याच्या टाकीचे बांधकाम ठेकेदाराने सुरू केले आहे.
पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरू असताना प्रकाश पाटील आणि हेमंत पाटील यांनी पाहणी केली. पाण्याच्या टाकीचे बांधकाम गुणवत्ता पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या आहेत. अनेक वर्षांपासून डावली रांजणखार ग्रामपंचायत हद्दीत असणार्या गावांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत होते. कधीतरी गावात येणार्या पाण्यासाठी रात्रदेखील जागून काढावी लागत होती. या पाण्याच्या योजनांमुळे गावातील प्रत्येक घरात नळ आणि पाणी दिले जाणार आहे. यामुळे ग्रामस्थांची पाण्यासाठी होणारी फरपट थांबणार आहे, असे शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील यांनी सांगितले.