| मुंबई | प्रतिनिधी |
खारघर मधील धामोळे या आदिवासी बहुल गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लवकरच सुटणार असल्याची ग्वाही सोमवारी सरकारने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर दिली.
खारघर मधील सेंट्रल पार्क जवळपास 300 एकर चा परिसर आहे. त्यापुढे 250 एकरचा गोल्फ कोर्स आहे. या गोल्फ कोर्सच्या पलीकडे धामोळे नावाचे आदिवासी गाव आहे. श्रीमंतांच्या गोल्फ कोर्स मध्ये शेकडो एकरात पाणी फवारले जात असले तरी सिडकोच्या कृपेने त्याला लागून असलेल्या धामोळे या आदिवासी बहुल गावात पाईप लाईन अद्याप पोहोचलेली नसल्याचा मुद्दा अंबादास दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.
गावात पाईपलाईन नाही, प्यायला पाण्यासाठी पायपीट करावी लागते. राजकारणी, प्रशासक यांना सांगून थकलो मात्र कुणीही काहीही केले नाही, अशी तक्रार गावकर्यांनी केली होती असे दानवे म्हणाले.
त्यावर सरकारकडून उत्तर देण्यात आले की, सदर गावच्या ठिकाणी वनखात्याच्या मंजुरी व काही त्रुटी अभावी पाईपलाईनसाठीचा प्रस्ताव प्रलंबित होता. 6.45 लाख रुपयांचे कामाला मंजुरी मिळाली असून येत्या 15 दिवसांत हे काम हाती घेतले जाईल अशी ग्वाही देण्यात आली.