वावोशीकरांची पाण्यासाठीची पायपीट थांबली

सरपंचांच्या पुढाकाराने टँकरने पाणीपुरवठा

| वावोशी | वार्ताहर |

सध्या उन्हाळ्याचे दिवस असून, वावोशी गावातील पाणीपुरवठा करणार्‍या विहिरींनी तळ गाठला असून, बोअररिंगचे पाणीदेखील कमी झाले आहे. परिणामी सर्वत्र पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच वावोशी गावातील व मल्हार नगरमधील सर्व महिलांनी ही पाण्याची समस्या सरपंचांपुढे मांडली. वावोशीच्या नवनिर्वाचित सरपंच अश्‍विनी शहासने यांनी या समस्येची तात्काळ दखल घेत खालापूर तालुक्यात या वर्षीचा पहिला पाणीटंचाईचा शासनाचा टँकर वावोशी गावात आणून महिलांना दिलासा देण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.

दरवर्षी प्रमाणे मार्च महिना उजाडला की वावोशी गावातील लोकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागते. त्यानंतर पिण्याच्या पाण्याचा टँकरदेखील फार उशिरा गावात येतो. त्यामुळे येथील महिलांना पाण्यासाठी कोसो दूर पायपीट करावी लागते. परंतु, सरपंच अश्‍विनी शहासने व ग्रामपंचायत सदस्य, प्रशासन यांच्या सहकार्याने तात्काळ खालापूरचे तहसीलदार आयुब तांबोळी, गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांना फोनवर संपर्क करून खालापूर तालुक्यात पहिला पाणीटंचाईचा शासनाचा टँकर हा वावोशी गावामध्ये आणण्यात यशस्वी झाल्या आहेत. या टँकरने वावोशी गावातील मल्हार नगर, आदिवासी वाडी, गावातील प्रत्येक गल्लीत पाणीपुरवठा केला जात आहे. यामुळे या रणरणत्या उन्हाळ्याच्या दिवसांत तात्काळ पिण्याच्या पाण्याची सोय होत असल्याने वावोशीकरांना दिलासा मिळाला आहे.

याकामी सरपंच अश्‍विनी शहासने, उपसरपंच दीपा शिर्के, सदस्य मयूर धारवे, भारती नाईक, पुनम भऊड, रिया वालम, मच्छिंद्र वाघमारे, मंजुळा वाघमारे व ग्रामसेवक प्रल्हाद पाटील सर्वांनी विशेष प्रयत्न केले असून, त्यांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.

Exit mobile version