पाणी योजना कोरडीच

चाफेवाडी नळपाणी योजना कोणाच्या घशात?

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील खांडस ग्रुप ग्रामपंचायतीमधील चाफेवाडीसाठी शासनाच्या जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना राबविण्यात आली आहे. मात्र, त्या नळपाणी योजनेच्या उद्भव विहिरीमध्ये भरपूर पाणीसाठा असतानादेखील परिसराला पाणी वितरण केले जात नाही. त्यामुळे ही योजना अवघ्या वर्षभरात कोणाच्या घशात घालण्यात आली, असा सवाल स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

खांडस ग्रुप ग्रामपंचायत हद्दीत चाफेवाडी ही वाडी असून, त्या मुख्य वाडीच्या आजूबाजूला पाच आदिवासी वाड्या आहेत. त्या वाड्यांसाठी जलजीवन मिशनमधून नळपाणी योजना 2021 मध्ये मंजूर झाली होती. 28 डिसेंबर रोजी जलजीवन मिशनमधून या नळपाणी योजनेच्या कमला मंजुरी मिळाली आणि प्रत्यक्ष काम 27 जुलै 2023 रोजी पूर्ण झाले. त्या नळपाणी योजनेमध्ये चिल्लार नदीवर विहीर तसेच पंप हाऊस, उद्भव विहिरी, उंचावरील पाणी साठवण टाकी तसेच वितरण व्यवस्था, याशिवाय तेथे नदीवर असलेल्या बंधार्‍याची दुरुस्ती आदी खर्च निविदेमध्ये अंगीकृत करण्यात आला होता. पाच वाड्यांसाठी असलेल्या नळपाणी योजनेची पाणी योजना कार्यान्वित झाली आणि अवघ्या सहा महिन्यांत बंद झाले आहे. तेथील शेतकरी अनंता बापर्‍या हिंदोळा यांच्या जमिनीमध्ये मुख्य उद्भव विहीर बांधण्यात आली आहे. त्या विहिरीमध्ये आजही भरपूर पाणी आहे. तरीदेखील गेल्या तीन महिन्यांत विहिरीमध्ये पाणी नाही असे कारण सांगून गावातील नळाला पाणी सोडले जात नाही. त्यामुळे नळपाणी योजना स्थानिक काही लोकांसाठी आहे की गावासाठी हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याच अन्य वाडी मध्ये असलेल्या ग्रामस्थांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने आवाज उठवायला आहे. सर्व वाड्यांसाठी असलेल्या या चाफेवाडी नळपाणी योजनेचे तीनतेरा वाजले असल्याने ही नळपणी योजना ग्रामस्थांसाठी आहे की कोणा एकट्यासाठी, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

लाखो रुपये खर्चून नळपणी योजना बनविली आहे आणि त्या योजनेच्या निविदेमध्ये चिल्हार नदीमधील सिमेंट बंधार्‍याची दुरुस्ती करण्यासाठी निधी मंजूर होता. मात्र, संबंधित योजनेचे काम ठेकेदाराने बंधार्‍याची कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली नाही आणि त्यामुळे उद्भव विहिरीचे खाली असलेल्या बांधर्‍यात आज पाणी नाही. त्या बंधार्‍याचेदेखील कोणतेही काम ठेकेदाराने केले नसल्याने जलजीवन योजनेचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे ही योजना कोणाच्या घशात घालण्यासाठी बनविली होती काय, असा प्रश्‍नदेखील आदिवासी विचारत आहेत.

नळपाणी योजनेचे पाणी वितरण करणारे कर्मचारी बदलले असल्याने आणि पाणी वितरण बंद झाले आहे. नळपाणी योजनेची समिती बनविण्यात आली आहे. विहिरीमध्ये पाणी असल्याने ते पाणी वितरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, येथील पाणीटंचाई दूर करण्यासाठी टँकर सुरू आहे.

मोरे, ग्रामविकास अधिकारी
खांडस ग्रामपंचायत
Exit mobile version