पेणमध्ये पाण्याची टाकी पत्त्यासारखी कोसळली

सुदैवाने जिवीत हानी टळली
नगरपालिकेचा बेजबाबदारपणा
दोषी कोण, सत्ताधारी की अधिकारी?

। पेण । वार्ताहार ।

नशिब बलवत्त म्हणून जिवीत हाणि नाही. पेण शहरामध्ये कापूर बाग येथील 4 लाख 70 हजार लिटर पाणी साठवण ठेवण्याची क्षमता असलेली टाकी अक्षरश: पत्त्याच्या इमारती प्रमाणे काल सायंकाळी जमीनदोस्त झाली. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झालेली नसली तरी या निमित्ताने पालिकेतील सत्ताधार्‍यांचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे.झालेल्या प्रकाराला जबाबदार कोण सत्ताधारी की अधिकारी असा संतप्त सवाल आता विरोधकांसह नागरिकांनी उपस्थित केला आहे.

2009 साली पेण शहरातील भविष्यातील पाण्याच्या व्यवस्थेचा विचार करून 5 ठिकाणी टाक्यांचे बांधकाम करण्याचे काम सुरू झाले. यामध्ये गोविंद बाग, महाडिक वाडी, अनंद नगर, प्रायव्हेट हायस्कूल आणि जल शुध्दीकीकरण केंद्रा जवळील टाकी. हे काम सुनिल फार्मा इंजिनियरींग करत होते. या ठेकेदाराने पायलींग पासून तीन टप्प्यांचे काम केले. त्या नंतर उरलेले काम 2013 मध्ये मार्क इन्फ्राटेक्चर या ठेकेदार कंपनीने टाक्यांचे वरील काम केले.

गोविंद बाग येथील टाकीचा विचार करता 2013 ला काम झाल्यानंतर ती टाकी बंद स्थितीतच होती. मात्र 2016-17 ला हया टाकीमध्ये प्रायोजिक तत्वावर पाणी भरण्यात आले होते. मात्र खाली दलदल निर्माण झाल्याने 2017 नंतर पाणी भरणं बंद केले. तो पर्यंत या टाकीसाठी जवळपास 40 ते 43 लाख रूपये खर्च झालेले होते. 2017 नंतर 5 सप्टेंबर 2021 रोजी या टाकीमध्ये पुन्हा पाणी भरण्यास सुरूवात केली. परंतु पाणी भरत असताना पूर्ण बेजबाबदारपणे पेण नगरपालिका वागत होती. अगोदरच या टाकीच्या पायाशी दलदल होती. त्यातच 5 तारखेपासून अधून मधून ही टाकी ओव्हरफ्लो व्हायची. मात्र त्याचे काहीही सोयरसुतक अधिकारी वर्गाला ना सत्ताधारी वर्गाला. टाकी ज्या वेळी पडली त्याच्या अगोदर पूर्ण ओव्हरफ्लो होऊन वाहत होती. मात्र ओव्हरफ्लो बंद करण्याचे सौजन्यसुध्दा कर्मचारी वर्गाकडून दाखवण्यात आले नाही. 5 ते 6 महिन्यापूर्वीच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडून पेण शहरातील टाक्यांचे स्ट्रक्चर ऑडीट व्हावे अशी मागणी करण्यात आली होती. परंतु भ्रष्टाचाराच्या दलदलीत फसलेल्या अधिकारी वर्गांनी व सत्ताधार्‍यांनी कानावर हात ठेवले, हे ही तेवढेच सत्य आहे.

संरक्षक भींत कोसळली
ज्यावेळी टाकी पडली त्यावेळी शेजारी असलेल्या घरांची तावदाने फुटली तर एका घराची संरक्षण भिंत जमीनदोस्त केली. फक्त एक दीड फुट इकडे तिकडे झाले असते तर घर टाकीच्या ढिगार्‍याखाली अला असता व पुढे काय हाणी झाली असती याचा विचार करणेही शक्य नाही. तरी या पडलेल्या टाकी संदर्भात योग्य ती चौकशी होउन दोषींवर कारवई न झाल्यास नगरविकास आघाडी कडून पेण नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती विरोधी पक्षाकडून देण्यात आलेली आहे.

शाळा-कॉलेज सुरू असते तर जिवीतहाणी अटळ
गोविंद बाग येथील पाण्याची टाकी म्हणजे शाळा,कॉलेज मधिल मुला-मुलींचे सेल्फी पॉइंट होते. अनेक वेळा या टाकीच्या जिन्यावर मुल-मुली बसलेली असत. तसेच बरोबर याच्या बाजूला नगरपालिकेचा गार्डन असल्याने फावल्या वेळेत महाविदयालयिन विदयार्थी या टाकीच्या परिसरात वेळ घालवताना दिसत असत. जर सुरळीत शाळा-कॉलेज सुरु असते तर जिवीतहाणी ही अटळ होती.


ऑडीट रिपोर्टची मागणी केली होती -संतोष पाटील (नगरसेवक)
डोंगरी टाकी संदर्भात रुपेश पाटील यांनी आमच्याकडे 5 ते 6 महिन्या पूर्वी तक्रार केली होती. त्यावेळी तक्रारीचा पाठपुरावा करत असताना मी स्वत: व माझे सहकारी शोमेर पेणकर यांनी पेण शहरातील 6 टाक्यांचे आडीट रिपोर्ट करावे, अशी मागणी केली होती. मात्र त्यावेळी अधिकारी वर्गानी कानाडोळा केला होता. तसेच हा विषय जनरल सभेमध्ये सुध्दा उपस्थित केला होता. त्यावेळी ऑडीट रिपोर्ट झाल्या शिवाय टाकीत पाणी भरले जाणार नाही, असे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले होते. मग ऑडीट रिपोर्ट नसताना टाकी का भरली? तरी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे.


ऑडीट रिपोर्ट न घेता टाकी भरण्यात आली- वसुधा पाटील
गोविंद बाग,कुंभार आळी, हुडको या परिसरात पाण्याच्या प्रेशरची समस्या होती. यासाठी स्थानिक नगरसेवक अर्पिता कुंभार, मंगेश पेडांमकर, ममता पाटील हे वारंवार अधिकार्‍यांशी संपर्कात होते. मात्र स्थानिक नगरसेवक पाण्याची समस्या सोडवण्यासाठी धावपळ करत होते. जर ही पाणी समस्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांकडून सुटली तर त्याचे श्रेय घेता येणार नाही, म्हणूनच सत्ताधार्‍यांनी इलेक्शन डोळया समोर ठेउन ऑडीट रिपोर्ट न करता टाकी भरण्याची घाई केली, हेच सत्य आहे. तरी सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी, अन्यथा विरोधी पक्ष नेता म्हणून मी पेण नगरपालिकेवर मोर्चा नेल्याशिवाय राहणार नाही.

Exit mobile version