माणगाव बसस्थानकात जाणारा मार्गच खडतर

अर्धवट काँक्रिटीकरणाच्या कामामुळे प्रवाशांचे हाल
। माणगाव। प्रतिनिधी।
माणगाव बसस्थानक आवारात गेले अनेक दिवस प्रवासी नागरिक बसस्थानकात पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांशी सामना करीत होते. आता तर येथे अर्धवट काँक्रिटीकरणाने स्थानकात जाण्याचा मार्गच खडतर झाला आहे. बसस्थानकातील प्रवेशद्वाराजवळ 16 लाख रुपये काँक्रिटीकरणाचे काम मंजूर करुन घेतले. त्याचे काम एका ठेकेदारामार्फत करण्यात आले होते. तब्बल दोन महिने लोटले हे काम झाल्यामुळे या काँक्रिटीकरणाच्या आजूबाजूंनी प्रवाशांना पायी ये-जा करावी लागते. या काँक्रिटीकरणाच्या बाजूने स्टील असल्यामुळे अनेकांच्या पायाला दुखापत होत आहे. तसेच खडी उघडी पडल्यामुळे प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

या बसस्थानकात परिवहन महामंडळ प्रशासनाने तात्काळ जेसीबी लावून तात्पुरते खड्ड्यांची डागडुजी केली होती. त्यानंतर 1 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सबंधित कामाच्या निविदा मागविण्यात आल्या होत्या, त्यानंतरही निविदा प्रक्रिया मंजूर करण्यात तीन महिन्यांपासून दिरंगाई चालूच राहिली. काँक्रिटीकरणाच्या कामाची 2 नोव्हेंबर रोजी संबंधित ठेकेदाराला वर्कऑर्डर देण्यात आली होती. त्यानुसार हे काम करण्यात आले. मात्र, तब्बल दोन महिन्यांपासून हे काम अर्धवट स्थितीत असल्याने बसस्थानकात येणार्‍या बस प्लॅटफॉर्मला उभी करण्यासाठी होत असल्याने बस चालक जिथे जागा मिळेल तिथे उभी करतात. त्यामुळे प्रवाशांना आपली बस कुठे उभी राहिली याची शोधाशोध करावी लागत असून, त्यांची गैरसोय होत आहे.

बसस्थानक आवारात प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने महामंडळाने याकडे दुर्लक्ष चालवले आहे. यापूर्वी कांही संस्थांमार्फत पाणपोई उभारण्यात आली होती. मात्र, ती पाणपोई नादुरुस्त नागरिकांची अधिकच गैरसोय होत आहे. तसेच बसस्थानक आवारात स्वच्छतागृह असून, तेथे दुर्गंधी पसरली आहे. अशा अनेक समस्या प्रवासी नागरिकांना भेडसावत असून, महामंडळाने याकडे लक्ष घालावे, अशी मागणी प्रवासी नागरिकांतून होत आहे.

Exit mobile version