शेकाप नेते माजी आ. जयंत पाटील यांचे प्रयत्न
| अलिबाग । प्रतिनिधी ।
डोंगरदर्यामध्ये राहणार्या आदिवासी, ठाकूर समाजाचा विकास साधण्यासाठी शेकाप नेते माजी आ. जयंत पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा केला. वारंवार अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा करून सभागृहाचे लक्ष वेधले. अखेर आदिवासी, ठाकूर समाजाच्या वाड्यांमध्ये जाणारा मार्ग सुखकर होणार आहे. अलिबाग तालुक्यातील मोरोंडे ते सत्यवाडी बारशेत आदिवासीवाडी रस्ता करण्यात येणार असून, त्यासाठी सुमारे 12 कोटी 26 लाख रुपयांचा निधीदेखील मंजूर केला आहे.
अलिबाग तालुक्यातील मोरोंडे ते सत्यवाडी बारशेत आदिवासी, ठाकूरवाडी डोंगर भागात असून, पायथ्यापासून डोंगराच्या टोकापर्यंत सुमारे एक तास पायपीट करावी लागत आहे. या वाड्यांपर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने रुग्णांना कापडी झोळ्यात घेऊन रुग्णालयात जावे लागत आहे. त्यांची ही समस्या शेकाप नेते माजी आ. जयंत पाटील यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याबाबत अधिवेशनात चर्चा केली. विशेष बाब म्हणून मोरोंडे ते बारशेत रस्ता मंजूर करा, अशी मागणी केली. रायगड जिल्हा परिषद अखत्यारित असलेल्या या रस्त्याला 2023 मध्ये मंजुरी मिळाली आहे. या रस्त्यामुळे दत्तवाडी (ठाकूरवाडी), होंडावाडी (ठाकूरवाडी), बारशेत (ठाकूरवाडी) या आदिवासी वाड्यांचा दळणवळणाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असून, पावसाळ्यात होणारी येण्या-जाण्याची गैरसोय दूर होणार आहे. तसेच या वाड्या मुख्य रस्त्याशी जोडल्या जाणार आहेत. शेकाप नेते माजी आ. जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने हा रस्ता मंजूर झाल्याने नागरिकांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
मोरोंडे ते सत्तेवाडी बारशेत रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारित येतो. या रस्त्याला शासनाच्या अर्थसंकल्पातून मंजुरी मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचे काम केले जाणार आहे.
-उपअभियंता, पंचायत समिती, बांधकाम
गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्यावरून पायी प्रवास करावा लागत होता. याबाबत जयंत पाटील यांच्याकडे रस्त्यासाठी मागणी केली. चारही वाड्यांमधील ग्रामस्थांनी त्यांची भेट घेतली होती. गेल्या वर्षी अधिवेशनात जयंत पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानुसार मोरोंडे ते बारशेत रस्ता आता मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे वाड्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
– मधुकर ढेबे, माजी सरपंच, बोरघर