आकर्षक जाळी व विविध प्रजातींचे कोळी लक्षवेधी, पर्यावरण व कीटक प्रेमींसाठी पर्वणी
| सुधागड -पाली | वार्ताहर |
सध्या जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारच्या कोळ्यांच्या प्रजाती व त्यांची आकर्षक जाळी दृष्टीक्षेपात येत आहेत. विशेष बाब म्हणजे निसर्ग व कीटक अभ्यासक व प्रेमींना यांचे निरीक्षण व अभ्यास करणे सोपे जात आहे. या कोळ्यांची आकर्षक तसेच आकाराने मोठी जाळी व हे रुबाबदार रंगीत कोळी येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधतात. हे कोळी रस्त्याच्या कडेला झाडे व झुडुपात पाहिल्यावर सर्वसामान्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरतांना दिसत आहेत.

अलिबाग येथील निसर्ग व वन्यप्राणी अभ्यासक प्रवीण कवळे यांनी सांगितले की, एरवी जंगलात आढळणारे हे कोळी हिवाळ्यामध्ये भक्ष्य कीटक मोठ्या प्रमाणात मिळत असल्याने जिल्ह्यातील रस्त्याच्या बाजूने असलेल्या झाडांवर व झुडुपांमध्ये जाळी करून राहतांना दिसत आहेत. आणि सहज दृष्टीक्षेपात पडत आहेत. तर काही छोटे कोळी घराच्या आजुबाजुला परसात जमिनीवर व झुडुपावर जाळी करून राहत आहेत. पांढऱ्या शुभ्र जाळ्यांवर पडलेले दव मोत्याप्रमाणे भासते.
कोळ्यांचे विविध प्रकार असून, वर्गवारी त्यांच्या जाळे विणण्याच्या पद्धतीवरून केली जाते.ही कोळ्यांची जात सर्वसामान्य आहे. वातावरणातील बदलांचा त्यांच्यावर फारसा परिणाम होतांना दिसत नाही.कोळी नरसाळ्या सारखे आकर्षक जाळे विणतो आणि त्यामध्ये भक्ष्य पकडतो. कोळी हा संधिपाद संघातील ॲरॅक्निडा वर्गाच्या ॲरेनीइडा या गणात समाविष्ट असलेला आणि रेशीमसारखा धागा तयार करणारा एक अष्टपाद प्राणी आहे. जगात कोळ्यांच्या सुमारे 60 हजार ज्ञात जाती आहेत.
प्रामुख्याने हे भूचर असले तरी त्यांच्या काही जाती सागरकिनारी पाण्यालगत आणि यूरोपिअन पाणकोळी ही जात गोड्या पाण्यातही आढळते. प्रामुख्याने कीटक भक्ष्य मिळू शकतात, अशा सर्व ठिकाणी कोळी आढळतात. वनात, शेतीच्या क्षेत्रात, घरात, वाळवंटात, दलदलीच्या प्रदेशात, उंच पर्वतावर, खोल खाणींमध्ये आणि अंधाऱ्या गुफांमध्येही कोळी आढळतात. कोळी अन्नाशिवाय पुष्कळ दिवस जगू शकतात. त्यांना आपल्या शरीरात पुष्कळ अन्न साठवून ठेवता येते. काही कोळी टाचणीच्या डोक्याइतके लहान असतात, तर दक्षिण अमेरिकेतील टॅरांटुला जातीचे काही कोळी पाय पसरले असता 25 सेंमी. इतके मोठे असतात. कोळी बहुधा करड्या, तपकिरी अगर काळ्या रंगाचे असतात, पण काही कोळी फुलपाखरांप्रमाणे आकर्षक रंगांचे सुद्धा असतात. बहुतेकांचे शरीर केसाळ असते. हे केस आखूड आणि अतिशय संवेदी असतात.
दोन प्रमुख प्रजाती
नरसाळ्यासारखे जाळे विणणारा कोळी, जंगलातील झाडांच्या खोडातील पोकळीमध्ये जाळे विणणारा कोळी मोठ्या प्रमाणात पहायला मिळत आहेत.
असे पकडतो भक्ष्य
कोळी बरेच दिवस अन्न-पाण्याव्यतिरिक्त राहू शकतात. अन्न पचवण्याची त्यांची वेगळी पद्धत आहे, ज्यात कोळी आपले पाचक रस आपल्या भक्ष्यात सोडतात आणि मग विघटित झालेले द्रव रूपातील अन्न शोषून घेतात.
या कोळ्यांना सध्या त्यांचे खाद्य कीटक व पतंग मोठ्या प्रमाणात भेटत आहे. हे कोळी वर्षभर भारतात सर्वत्र आढळतात. निसर्गतःच संरक्षित असल्याने त्यांना संरक्षणाची आवश्यकता नाही.
शंतनू कुवेसकर,वन्यजीव अभ्यासक, रायगड
सध्या हे कोळी सर्वत्र दिसत आहेत. शेतामध्ये देखील यांचे वास्तव्य आहे. पर्यावरण संतुलनासाठी इतर प्राण्यांप्रमाणे कोळ्यांचे देखील योगदान महत्वपूर्ण आहे.
शंतनू लिमये, प्राणीपक्षी रक्षक, पाली,