। सुतारवाडी । वार्ताहर ।
ग्रामीण भागात भरणारा आठवडा बाजार हा अनेक ठिकाणच्या नागरिकांना लाभदायी ठरतो कारण त्या ठिकाणी मिळणारा भाजीपाला, कांदे,बटाटे, सुकट, बोंबील असे त्याचप्रमाणे पावसाळी साठवणूकीसाठी लागणारे वाल, चवळी, हरभरे, सुकी मासळी या वस्तू मोठया प्रमाणात उपलब्ध असतात.त्यामुळे ग्रामस्थांना आठवडाभराचा भाजीपाला बाजारातून आणणे शक्य होते. विळे-भागाड या ठिकाणी दत्तमंदिराच्या पलिकडे भरणारा बुधवारचा आठवडा बाजार येथील राहणार्या ग्रामस्थांना तसेच कंपनी कामगारांना हा बाजार प्रेरणादायी ठरला आहे. मुख्य म्हणजे विळे-भागाड परिसरात विविध कंपन्या सुरु झाल्या आहेत.त्यामुळे या परिसरामध्ये लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. येथील कामगारांना तसेच स्थानिक नागरिकांना हा आठवडा बाजार महत्वाचा ठरला आहे. पुणे-माणगाव, भिरा कोलाड कडे जाणार्या रस्त्याच्या बाजूला हा बाजार भरत असल्यामुळे या ठिकाणी वाहनांची कमतरता भासत नाही.