आंबे, रानमेवा मुबलक उपलब्ध
। मुरूड-जंजिरा । वार्ताहर ।
ओल्या काजुगरांचा हंगाम संपल्याने विक्रीसाठी विविध भागातून येणार्या आदिवासी महिला देखील मुरूड बाजारपेठेत दिसून येत नाहीत. मात्र भाजी मार्केट बाहेर गावागावातून महिला हापूस, रायवळी आंबे विक्रीस आणत आहेत असे दिसून येत आहे.
कडक उन्हाच्या काहिलीने सर्वच हैराण झाले असून वातावरणात तापमान वाढते आहे. मुरूड शहरात सर्वच अंतर्गत रस्ते डांबरी झाल्याने वातावरण आधिक तापत असून उष्णतेची वाफा तोंडावर येत आहेत. यंदा एप्रिल, मे महिन्यात रोहा, मुरूड तालुक्यातील ग्रामीण भागातून आदिवासी महिलांनी ओले काजूगर, मोठ्या प्रमाणावर मुरूड मार्केटमध्ये विक्रीस आणले होते. 120 ते 130 रुपये शेकडा दर काजुगराला मिळत होता. नागरिक आणि पर्यटकांनीदेखील ओले काजूगर मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्याचे दिसून आले. रोहे तालुक्यातील मुचणे, कांडने, मुरूड तालुक्यातील नागशेत, शिघ्रे आदिवासी वाडी येथून देखील मे महिन्याच्या अखेरपर्यंत महिला काजूगर विक्रीस आणत होत्या.सध्या मुरूड मार्केटमध्ये करवंद, जांभळे असा रानमेवा विक्रीस येताना दिसून येत आहेत. हापूस आंब्याचे दरदेखील खाली आले आहेत. हापूस आंबे 300 रुपये डझनाने मिळत आहेत. करवंद, जांभळे, कोकम आदी रानमेवा मार्केटमध्ये दिसून येत आहे. तापमान 41 अंशावर पोहोचल्याने गावठी भाज्यादेखील सुकून जात असल्याचे दिसत आहे.







