नित्कृष्ट कामांची चौकशी करण्याची मागणी
। नेरळ । प्रतिनिधी ।
कल्याण-कर्जत राज्यमार्ग रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याने मागील 15 दिवसांत गतिरोधकांवर पांढरे पट्टे वाहनाच्या सुरक्षेसाठी मारले होते. मात्र, ते पांढरे पट्टे आठ दिवसांतच दिसेनासे झाले आहेत. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून असे नित्कृष्ट काम करणार्या ठेकेदाराच्या कामाची चौकशी करण्याची मागणी स्थानिक वाहनचालक करीत आहेत.
कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील कर्जत चारफाटा ते वडवली गाव हा रस्ता काँक्रीटचा बनविला गेला आहे. तर, वडवलीपासून शेलू येथील रस्ता डांबरीकरण केला गेला होता. या 21 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे देखभाल दुरुस्तीचे निविदा राज्याचे हायब्रीड तत्वावर देण्यात आली होती. पी.पी. खारपाटील कंपनीने हे दहा वर्षाची देखभाल दुरुस्तीचे कंत्राट मिळविले होते. या रस्त्यामध्ये डांबरी रस्त्यावर नव्याने कार्पेट डांबरीकरण केले जात आहे. त्यामुळे पावसाळ्यात हा रस्ता खड्डेमुक्त झालेला दिसणार आहे. या रस्त्यावर विविध भागात गतिरोधक बनविण्यात आले आहेत. त्या सर्व गतिरोधकांवर डांबरीकरण नंतर पांढरे पट्टेदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मारले जात आहेत. त्यामुळे वाहन चालकांना रात्रीदेखील गतिरोधक दिसत नाही.
येत्या पावसाळ्यामध्ये वाहन चालकाना अंदाज घेण्यासाठी पांढरा पट्टा नसल्याने गाडी डिव्हायडरवर चढण्याची शक्यता आहे. तसेच, रस्त्यावर डांबरीचे कार्पेट वारंवार टाकल्याने रस्त्यामधील दुभाजकांची उंचीदेखील कमी झालेली आहे. त्यामुळे गाडी दुभाजकवर चढून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. रस्त्याच्या सोबत डिव्हायडरच काम करणे तितकेच गरजेचे आहे, अशी मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे.






