मेटेंच्या मृत्यूबाबत पत्नीही साशंक; मुळगावी अंत्यसंस्कार

। बीड । प्रतिनिधी ।

अमर रहेच्या जयघोषात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या पार्थिवावर सोमवारी केज तालुक्यातील राजेगाव या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यभरातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते अंत्यविधीसाठी उपस्थित होते.

मेटे यांच्या अपघाती निधनाबाबत शंका उपस्थित केली जात असल्याने मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, विनायक मेटे यांच्या पत्नी डॉ.ज्योती मेटे यांनीही पतीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला आहे. मी स्वत: डॉक्टर असल्यामुळे त्यांना पाहिल्याबरोबर माझ्या लक्षात आलं की काहीतरी वाईट घडलंय. कारण मेडिकल टर्मीनोलॉजीनुसार, मृत्यूनंतर माणूस एवढ्या लवकर पांढरा पडत नाही. काही वेळ गेल्यानंतर तो पांढरा पडतो. पण मेटे यांचा चेहरा अतोनात पांढरा पडला होता असं ज्योती मेटे यांनी सांगितलं.

Exit mobile version