महिला सरपंच खुनातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या

। महाड । वार्ताहर ।
महाड तालुक्यातील आदिस्ते गावाच्या सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे यांच्या खुनातील आरोपीपर्यंत पोहोचण्यास महाड तालुका पोलिसांना यश आले असून शेजारी राहणार्‍या एका विवाहित तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. श्‍वान पथकातील श्‍वानाने दाखवलेल्या मार्गानुसार पोलिसांना आरोपीपर्यंत जाणे शक्य झाले. अमीर शंकर जाधव वय 30 असे खुनी आरोपीची नाव आहे. दि.27/ 12/ 2021 रोजी आदिस्ते गावच्या सरपंच मीनाक्षी मनोहर खिडबिडे यांचा निघृण खून झाल्याची घटना समोर आली होती. महिला सरपंचाच्या खुनाच्या घटनेने संपूर्ण महाड तालुका हादरला होता. त्यातच हि मयत महिला विवस्त्र अवस्थेत आढळून आल्याने प्रकरणाला एक वेगळेच वळण लागले होते. अधिवेशन सुरु असतानाच ही घटना घडल्याने पोलीस प्रशासनाने देखील तपासाला गती दिली. घटना घडल्यानंतर श्‍वान पथकाच्या सहाय्याने आरोपीचा माग काढणे शक्य झाले. आरोपीचे नाव अमीर शंकर जाधव वय 30 असे असून हा आरोपी ज्याठिकाणी मयत महिला सरपंच मीनाक्षी खिडबिडे राहत होत्या त्या शेजारीच राहत होता. आरोपी अमीर शंकर जाधव याने पूर्ववैमनस्यातून शुल्लक कारणातून खून केल्याची कबुली दिली असल्याची माहिती महाड तालुका पोलीस उपविभागीय अधिकारी निलेश तांबे यांनी सांगितले. खुनातील आरोपी अमीर शंकर जाधव याच्याविरोधात भाद्वी कलम 302, 376, 201 नुसार गुन्हा दाखल केला आहे.


आरोपी स्थानिक असावेत असा संशय सुरूवातीपासूनच व्यक्त केला जात असल्याने आदिस्ते गावात पोलीस पथके रवाना केली होती. खुनाची घटना समोर येताच पोलीस पथकाने तत्काळ श्‍वान पथक मागवले. घटनास्थळी सुमारे चार तासातच श्‍वान पथक दाखल झाले. श्‍वानपथकाच्या श्‍वानाने गावातील एका वाड्यापर्यंत जावून आरोपीचा मार्ग दाखवला. यातूनच या खुनाचा तपास लावणे शक्य झाले आहे. या प्रकरणात आणखी सह आरोपी आहेत का याबाबत तपास सुरु असल्याचे देखील पोलिसांनी सांगितले.

आरोपींवर कारवाई करण्याची मागणी
या घटनेतील आरीपींवर कठोर कारवाई यावी अशा प्रकारची मागणी या ठिकाणच्या संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तसेच मिनाक्षी खिडबिडे यांचे पुत्र सचिन यांनी पोलिसांकडे केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Exit mobile version