। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोरोना लाटेमुळे पुढे ढकलण्यात आलेला महिला एकदिवसीय वर्ल्डकप हा 4 मार्चपासून न्यूझीलंडमध्ये सुरू होणार आहे. याबाबत आयसीसीने हा वर्ल्डकप ठरल्याप्रमाणेच होणार असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, न्यूझीलंडमध्ये कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमिक्रॉन डोके वर काढत असल्याने त्याचा फटका पुन्हा महिला क्रिकेट एकदिवसीय वर्ल्डकपला बसणार का अशी शंका व्यक्त केली जात होती. न्यूझीलंडने कोरोना निर्बंध अधिक कडक करण्यासही सुरूवात केली आहे. महिला वर्ल्डकपच्या सीईओ अँड्रा नेल्सन यांनी सांगितले की, वर्ल्डकपच्या 35 दिवसांच्या ठरलेल्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आम्ही जुन्या वेळापत्राकाप्रमाणेच स्पर्धा आयोजित करणार आहोत. नेल्सन माध्यम प्रतिनिधींच्या व्हर्च्युअल मिटिंगमध्ये बोलताना म्हणाल्या की, आम्ही अनेक प्लॅन्सवर काम केले पण, वर्ल्डकप हा ठरल्या वेळेनुसार न्यूझीलंडमधील सहा ठिकाणांवरच होईल. महिला एकदिवसीय वर्ल्डकपचे आठ संघातील 31 सामने हे न्यूझीलंडच्या माउंट मौनगानुई, ड्युनडीन, वेलिंग्टन, ऑकलँड, हॅमिल्टन आणि ख्रिस्टचर्च येथे होणार आहेत. जरी स्थानिक आणि द्विपक्षीय आंतरराष्ट्रीय मालिका या प्रेक्षकांविना खेळवल्या जात असल्या तरी महिला एकिदसीय वर्ल्डकप आयोजित करणार्या समितीने चाहत्यांसाठी सर्व पर्याय खुले ठेवले आहेत.