। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
कोकण व पश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा सर्वात महत्त्वाचा असलेला करूळ घाट गेले 11 महिने नूतनीकरणाच्या नावाखाली बंद ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून घाटातून वाहतूक सुरू करण्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, वाहतूक सुरू करण्यास ते अपयशी ठरले आहेत. त्यांच्याकडून ‘तारीख पे तारीख’ देण्यात येत आहे. 15 डिसेंबरपर्यंत घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल, तर जानेवारी 2025 पासून घाटातून पूर्णपणे वाहतूक सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, घाटातील अपूर्ण काम पाहता दिलेली डेडलाईन तरी ते पाळणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, जुलैमध्ये झालेल्या पावसाने नवीन बांधलेल्या संरक्षक भिंतीसह रस्ताच वाहून गेल्यामुळे रस्त्याच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे पितळ उघडे पडले होते. याबाबत सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकार्यांनी आवाज उठवला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खराब झालेले काम परत संबंधित ठेकेदाराकडून करून घेण्याचे आश्वासन देण्यात आले. यादरम्यान पावसाचे चार महिने निघून गेले. तर, पावसाळा कमी होऊन आता दोन महिन्यापेक्षा जास्त काळ होऊन गेला आहे. मात्र घाटातील काम अद्याप पूर्ण झालेले नाही.