पोलादपूर नगरपंचायतीमधील कामकाज ठप्पच

कर्मचार्‍यांची निवडणूक प्रशिक्षणास प्रतिनियुक्ती

| पोलादपूर | प्रतिनिधी |

अपुरा स्टाफ आणि तात्पुरते, प्रभारी आणि कायमस्वरूपी नियुक्ती होऊनही सतत बदलत असलेले मुख्याधिकारी यामुळे पोलादपूर नगरपंचायतीचे कामकाज अनेकदा ठप्प झाल्याने नागरिकांतर्फे राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांनी आमरण उपोषण व आंदोलने करूनही कामकाज कर्मचारी व अधिकार्‍यांच्या बदल्यांमुळे कामकाज ठप्प राहण्याची परंपरा आता विधानसभा निवडणूककामी कर्मचार्‍यांची निवडणूक प्रशिक्षण कामी प्रतिनियुक्ती करण्यात आल्याने सुरू आहे. सध्या केवळ सफाई कामगार आणि शिपाई पदाच्या व्यक्तीच्याहाती कारभार ठेऊन रामभरोसे झालेल्या नगरपंचायतीमध्ये शुकशुकाट दिसून येत आहे. घरपट्टी व कर जमा करण्याचा अधिकार दिलेल्या या कर्मचार्‍यांना अ‍ॅसेसमेंट उतार्‍यावर सहीचा अधिकार अधिकार नसल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
महाड विधानसभा मतदारसंघातील महाड तालुक्यात 213, माणगाव तालुक्यात 113 आणि पोलादपूर तालुक्यात 67 अशी एकूण मतदान 393 केंद्र असून, 393 मतदान केंद्रनिहाय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यामध्ये माणगावमधील 97 शिक्षक, 2 ग्रा.पं.कर्मचारी, 31 अंगणवाडी सेविका, कृषीसहायक 1 आणि 2 तलाठी असे 113 कर्मचारी महाडमधील 105 शिक्षक, 65 ग्रा.पं.कर्मचारी, 10 अंगणवाडी सेविका, कृषीसहायक 9 आणि 24 तलाठी असे 213 कर्मचारी तर पोलादपूरमधील 33 शिक्षक, 18 ग्रा.पं.कर्मचारी, कृषीसहायक 8 आणि 8 तलाठी असे 65 कर्मचारी तर संपूर्ण महाड विधानसभा मतदार संघामध्ये 215 शिक्षक, 85 ग्रा.पं.कर्मचारी, 41 अंगणवाडी सेविका, कृषीसहायक 18 आणि 34 तलाठी असे 393 कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.

नोडल ऑफिसर टिम 15, सेक्टर ऑफिसर्स 61, सेक्टर पोलीस ऑफिसर्स 61, फ्लाईंग सर्व्हेलन्स टिम 9 पथकांत 30 कर्मचारी, स्टॅटीक सर्व्हेलन्स टिम 9 पथकांत 30 कर्मचारी, व्हिडीओ सर्व्हेलन्स टिम 9 पथकांत 41 कर्मचारी, व्हिडीओ व्हिवींग टीम 1 पथकांत 3 कर्मचारी आणि अकाऊंटींग टीम 1 पथकांत 14 कर्मचारी, अशा प्रशिक्षित करण्यात आले असून, आवश्यक मनुष्यबळ 1965 आणि 2718 डाटा एन्ट्री स्टाफ असे असल्याचे अधिकृत अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे. मात्र, या अहवालामध्ये महाड, माणगाव आणि पोलादपूर या तीनही तालुक्यांमध्ये नगरपंचायत नगरपालिका कर्मचारी, आशासेविका आणि शाळेचे क्लार्क यांना निवडणूक कामी प्रतिनियुक्त करण्यात आले नसल्याचे नमूद केले आहे.

यामुळे गेल्या काही दिवसांपासून पोलादपूर नगरपंचायत कार्यालयामधील टेबल-खुर्च्या रिकाम्या राहण्यामागे अहवालात नमूद कर्मचार्‍यांपेक्षा अधिक कर्मचार्‍यांची निवडणूककामी प्रतिनियुक्ती देण्यात आल्याने या कर्मचार्‍यांचे विधानसभा निवडणूकपूर्व प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे, हेच कारण सांगितले जात आहे. पोलादपूर नगरपंचायतीची रिक्त पदे कधी भरणार, कायमस्वरूपी मुख्याधिकारी कधी मिळणार यापेक्षाही आता निवडणुकीनंतर तरी नगरपंचायतीचे नियमित कामकाज सुरू होणार काय, असा सवाल नागरिकांना भेडसावू लागला आहे.

Exit mobile version