परशुराम घाटातील मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू होणार

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे-परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे 2016 पासून रखडलेले काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला. 23 डिसेंबरला रस्त्याचे काम सुरू करण्याचा निर्णय प्रांताधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठकीत झाला. 22 डिसेंबरला मार्किंग केले जाणार आहे.
प्रत्यक्षात कामास सुरुवात करण्यापूर्वी पेढे-परशुराम संघर्ष समितीसोबत संयुक्त बैठक झाल्याने पोलिस बळाचा वापर करावा लागणार नसल्याचे संकेत मिळाले आहेत.
अ‍ॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामाविषयी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीत पोलिस बळाचा वापर करून काम सुरू करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
या पार्श्‍वभूमीवर प्रत्यक्ष परशुराम घाटात कामास सुरुवात करण्यापूर्वी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी तहसीलदार, राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी, दोन्ही ठेकेदार कंपन्या, पेढे-परशुराम संघर्ष समिती सदस्य, अ‍ॅड. पेचकर, उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस निरीक्षक आदींची संयुक्त बैठक आज घेतली. दरम्यान, परशुराम देवस्थान, खोत व कूळ यांच्यातील वादामुळे मोबदल्याची 43 कोटी रक्कम न्यायालयात जमा करण्यात आली होती. सध्या परशुराम घाट धोकादायक झाला आहे. विसावा पॉइंटपासून काही अंतरावरच दरड घसरल्याने रस्त्याचा काही भाग खचला. पावसाळ्यात घरावर दरड कोसळून पेढे कुंभारवाडीतील तिघांचा मृत्यू झाला होता.
आता खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणी धोका वाढल्याने एकेरी वाहतूक सुरू आहे. याची दखल घेत न्यायालयाने बैठक घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार समितीच्यावतीने अ‍ॅड.ओवेस पेचकर यांनी बाजू मांडली. घाटात संरक्षक भिंती, कठडे, मोर्‍या व धोकादायक वळण काढण्याची मागणी समितीच्या वतीने करण्यात आली.

Exit mobile version