| अलिबाग | वार्ताहर |
पेझारीतील गुरूवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठान हे नेहमीच विविध सामाजिक कार्य करते. पण सातत्याने 24 वर्षे हे प्रतिष्ठान शैक्षणिक साहित्य वाटपाचे कौतुकास्पद कार्य करत असल्याचे गौरवोद्गार रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या भावना पाटील यांनी काढले. सोमवारी (दि.17) राजिप शाळा पेझारी येथे गुरुवर्य सुभानराव राणे प्रतिष्ठानच्या शैक्षणिक साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात त्या प्रमुख अतिथी म्हणून बोलत होत्या.
मागील 24 वर्षांपासून हे प्रतिष्ठान बोधस्वरूप सद्गुरू साबाजीदादा शेडगे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगड जिल्हा परिषदेच्या 19 शाळांमधील 800 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करते. यावर्षीचा कार्यक्रमाचा प्रारंभ राजिप शाळा पेझारी येथून सोमवारी झाला. यावेळी भावना पाटील पुढे म्हणाल्या, फार मोठे कार्य हे प्रतिष्ठान करत आले आहे. आम्हीदेखील त्यांना मोलाचे सहकार्य करतो, असे म्हणून त्यांनी शाळेच्या शिक्षकवृंद व गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी व्यासपीठावर प्रतिष्ठानचे अध्यक्ष व श्रीपंत सांप्रदाय रायगड जिल्हाप्रमुख दिगंबर राणे, अशोक शिगवण, अरूण पाटील, अनिल पाटील, सुमित राणे, निकेश पाटील, आशिर्वाद पाटील, अरूण म्हात्रे, नरेश म्हात्रे, शाळेचे शिक्षक नितीशकुमार पाटील, प्रतिष्ठानच्या गुरूभगिनी, ग्रामस्थ, पालक, शिक्षकवृंद आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीशकुमार पाटील यांनी केले.
प्रतिष्ठानच्या सदस्यांनी सोमवार दि.17 रोजी राजिप शाळा पेझारीसह धेरंड, मोठे शहापूर, धाकटे शहापूर, बांधण, नागझरी, वाघोडे या शाळांमध्ये जाऊन शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी, विविध शाळांतील शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालकांनी परिश्रम घेतले.