प्रीतम म्हात्रे यांचे गौरवोद्गार
| पनवेल | प्रतिनिधी |
सतत 24 तास निःस्वार्थीपणे काम करणारा पत्रकार हा खर्या अर्थाने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. पनवेल, उरण आणि नवी मुंबईमधील पत्रकार चांगले काम करीत आहेत. पत्रकारांनी चांगले काम करून समाजात चांगला आदर्श निर्माण केला आहे, त्यामुळे पत्रकारांप्रती आदर प्रेम बाळगत एक कुटुंब म्हणून म्हात्रे कुटुंबातर्फे दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी दिली.
शनिवारी सकाळी 11 वाजता रंजना बंगला, जे.एम. म्हात्रे यांचे निवासस्थान, कोपर गाव, सेक्टर 8, उलवे येथे पत्रकारांसाठी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रीतम म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याचवेळी पत्रकार आप्पासाहेब मगर यांच्या जनसभा या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक जे.एम. म्हात्रे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत यांनीही पत्रकारांच्या कार्याचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, पत्रकार मंदार दोंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करत एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगत जे.एम. म्हात्रे, प्रीतम म्हात्रे यांचे आभार मानले. दिवाळी फराळ कार्यक्रमामुळे पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.