चिखलातून काढावा लागतोय मार्ग
। रायगड । खास प्रतिनिधी ।
उमटे धरणाच्या भिंतीला भगदाड पडल्याची बातमी दैनिक कृषीलने दिली होती. उमटे धरण संघर्ष ग्रुपने याबाबतची तक्रारही जिल्हा प्रशासनाकडे केली होती. यासर्व प्रकरणाची दखल अलिबाग तहसिलदार यांनी घेऊन धरणाची दुरुस्ती तातडीने करणे गरजेचे असल्याचा अहवाल दिला होता. त्यानुसार आता धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. धरणाच्या ठिकाणी चिखल झाल्याने बांधकाम साहित्य नेताना संबंधितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सध्या पावसाला सुरुवात झाली आहे. दोन महिन्यांआधी शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई व अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या माध्यमातून धरणातील गाळ काढण्यात आला होता. त्यामुळे धरणात लाखो लिटर पाण्याचा अतिरिक्त साठा होण्यास मदत मिळणार असल्याचे उमटे धरण संघर्ष ग्रुपचे अॅड. राकेश पाटील यांनी सांगितले. गाळ काढल्याने पाण्याचा अतिरीक्त साठा होणार आहे. त्यातच धरणाच्या भिंतीची दुरवस्था झाली आहे. भिंतीला भलेमोठे भगदाड पडल्याने 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्यांना धोका निर्माण झाला आहे. याबाबत कृषीवलने याचा सातत्याने पाठपुरवा सुरुच ठेवला होता. तसेच अॅड.राकेश पाटील यांनी याबाबत तक्रारही दाखल केली होती.
जिल्हा परिषदेच्या कामकाजावर नागरिकांमध्ये टीका होऊ लागल्यामुळे रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड तसेच ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी संजय वेंगुर्लेकर यांच्यासह अन्य अधिकारी उमटे धरणावर प्रत्यक्ष जाऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर उमटे धरणाच्या भिंतीच्या कामाला सुरुवात करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण आहे.
धरणाच्या भिंतीचे काम सुरु करण्यात आले असले, तरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल साठलेला आहे. त्यामुळे बांधकामाचे साहित्य पोचवण्यात संबंधितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. सध्या दोन ट्रॅक्टर-ट्रॉलीच्या मदतीने साहित्य पोचवण्यात येत आहे. अधुनमधून पाऊस पडत असल्याने कामात व्यत्यय येत असल्याचे दिसून येते.
उमटे धरणाच्या भिंतीला पडलेल्या भगदाडीच्या कामाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरुवात झाली आहे. धरणाच्या बांधावर असलेली मोठी झाडी तोडून एक प्रकारे उमटे धरण कित्येक वर्षानी मोकळा श्वास घेत आहे. त्याबद्दल जिल्हा परिषदेचे आभार.
अॅड. राकेश पाटील, उमटे धरण संघर्ष ग्रुप रायगड