रायगड जिल्हा सहकारी बँकेचे कार्य सहकारातील सर्व बँकांसाठी अभिमानास्पद- के.एस.रघुपथी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार क्षेत्रामध्ये केलेले कार्य हे अभिमानास्पद असून बँकेच्या कार्यप्रणालीचा अभ्यास आणि अनुकरण देशातील सर्वच सहकारी बँकांनी करावा, असे प्रतिपादन नाबार्डच्या डिपार्टमेंट ऑफ सुपरव्हीजनचे चीफ जनरल मॅनेजर के.एस.रघुपथी यांनी केले. नाबार्डच्या रायगड जिल्ह्यातील अभ्यास दौर्‍यानिमित्ताने त्यांनी बँकेस भेट दिली, त्यावेळी हे प्रतिपादन केले. रिझर्व्ह बँक प्रेरित केंद्र सरकारच्या आर्थिक मंत्रालयाच्या आधिपत्याखाली नाबार्ड कार्यरत असून त्यातील देशाच्या सर्व सहकारी बँकांचे परीक्षण करण्याचे कामकाज ज्या विभागाच्या वतीने केले जाते त्या डिपार्टमेंट ऑफ सुपरव्हीजनचे सीजीएम के.एस.रघुपथी, जनरल मॅनेजर डी.के.गवळी, जनरल मॅनेजर विनीता सिंग यांच्यासह 5 डिजीएम आणि इतर २७ अधिकार्‍यांनी यावेळी बँकेच्या केंद्र कार्यालयाला भेट दिली. यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर वाघमोडे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक प्रदीप आपसुंदे, बँकेचे संचालक परेश देशमुख, चीफ मॅनेजर भारत नांदगावकर, तसेच बँकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.


रायगड जिल्हा सहकारी बँकेने आजवर नाबार्डच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बचतगट उपक्रम, केसीसी कार्ड वितरण, ई-शक्ती, संस्थांचे संगणकीकरण अशा अनेक विषयांत उल्लेखनीय कामगिरी केलेली असून बँकेने आपल्या व्यवसायामध्ये देखील सातत्य राखले आहे. शिवाय सहकारी बँक म्हणून मर्यादा असताना देखील खाजगी आणि राष्ट्रीयकृत बँकांच्या स्पर्धा करणारी बँक म्हणून जिल्हा बँकेने निर्माण केलेली ओळख याबाबत नाबार्डच्या डिपार्टमेंट ऑफ सुपरव्हीजनचे चीफ जनरल मॅनेजर के.एस.रघुपथी यांनी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांचे कौतुक केले. तसेच बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आधुनिक संकल्पना आणि अद्यावत तंत्रज्ञान यांचा स्विकार करून बँकेचे धोरण यशस्वीपणे राबविले याबाबत त्यांचेही अभिनंदन केले. यावेळी नाबार्डचे जनरल मॅनेजर डी.के.गवळी यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना बँकेमध्ये तिसर्‍यांदा येण्याचा योग आला आणि प्रत्येकवेळी बँक नवीन गोष्टी सुरू केल्याबाबत अभिनंदन करण्याची संधी मला उपलब्ध करून देते, आणि यावेळी आयएमपीएस, युपीआय, गुगलपे, कयूआरकोड या आधुनिक सुविधा सुरू केल्याबाबत बँकेचे विशेष कौतुक केले.

यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी बँकेच्या कामकाजाचे सादरीकरण उपस्थितांसमोर केले. तसेच नाबार्डने बँकेला वेळोवळी प्रोत्साहित केल्याबद्दल नाबार्डचे आभारही मानले. या अभ्यास दौर्‍यात नाबार्डच्या अधिकार्‍यांनी बँकेच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या जनजागृती बचतगटाला परहुर येथे भेट दिली आणि त्या बचतगटातील महिलांशी संवाद साधला. नाबार्डच्या अधिकार्‍यांनी या संपूर्ण भेटीत बोरेश्वर मच्छिमार सहकारी सोसायटी नवगाव तसेच बोर्लीमांडला विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेला भेट दिली आणि रायगड जिल्हा सहकारी बँकेच्या समवेत जिल्ह्यातील सहकारी संस्थांमध्ये देखील उल्लेखनीय कामकाज केले जाते त्याबद्दल दोन्ही संस्थांचे विशेष अभिनंदन केले.

Exit mobile version