चिकणी पुलाचे काम वेळेत पूर्ण व्हावे

पाण्याच्या निचर्‍यासाठी पुलाला गाळा वाढविण्याची मागणी
| कोर्लई | वार्ताहर |
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे साळाव-मुरुड रस्त्यावर काशिद ग्रामपंचायत हद्दीतील खचलेल्या चिकणी पुलाच्या भरावाचे होत असलेले काम वेळेत पूर्ण व्हावे तसेच पूर व भरतीच्या वेळी पाण्याचा धोका लक्षात घेऊन या पुलाला एक गाळा वाढविण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने मनसेचे अध्यक्ष शैलेश खोत यांनी केली आहे. जोरदार पावसामुळे दि.11 जुलै रोजी तालुक्यातील काशिद पूल कोसळून घडलेली घटना ताजी असताना पावसाळ्यापूर्वी तालुक्यातील छोट्या-मोठ्या पुलांवरुन झालेल्या अवजड वाहतुकीने पूल कमकुवत होऊन त्यांना अखेरची घरघर लागल्याचे चित्र चिकणी, विहूर येथील पुलाच्या पावसाळ्यात झालेल्या दुरवस्थेने समोर आले.

आगामी काळात नारळी पौर्णिमा-रक्षाबंधन, गौरी गणपती सण येत असून, मुंबई, पुणे अन्य ठिकाणांहून चाकरमानी गावाकडे येत असतात. याकरिता अलिबाग-साळाव-मुरुड मार्गावर एसटी सेवा लवकरात लवकर सुरु होणे अपेक्षित आहे. यासाठी चिकणी व विहूर येथील पुलाच्या भरावाचे काम वेळेत पूर्ण व्हावे व चिकणी पुलाला पुराच्या पाण्याचा पुरेपूर निचरा होण्यासाठी एक गाळा वाढविण्यासाठी योग्य ती उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी शैलेश खोत यांनी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.

Exit mobile version