| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात सहकार मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. जिल्ह्यामध्ये सहकारात चांगली वाढ आहे. गोरगरीबांसाठी पतसंस्था, पतपेढी एक चांगले साधन आहे. सहयोग नागरी सहकारी संस्थेचे काम उत्तम आहे. सहकारासाठी पुढील काळ चांगला आहे. संस्थेचे कामकाज गतिमान आहे. पुढील काळात अर्थकारण बदलणार आहे. त्यानुसार अभ्यास केल्यास सहयोग संस्था अधिक वेगळ्या उंचीवर जाईल, असा विश्वास रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन जयंत पाटील यांनी केला.

सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेची 25 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अलिबागमधील चेंढरे येथील चिंतामणराव केळकर विद्यालयाच्या सभागृहात रविवारी (दि. 14) आयोजित करण्यात आली. यावेळी जयंत पाटील बोलत होते. यावेळी संस्थेचे चेअरमन योगेश मगर, उपाध्यक्ष संजय पाटील, सर्व संचालक, सभासद, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी जयंत पाटील म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रात काम करीत आहे. या क्षेत्रात काम करीत असताना कधीही राजकारण केले नाही. सर्वांना मदत करण्याचे काम 35 वर्षांच्या कारकीर्दीत काम केले. त्यामुळे एक वेगळा विश्वास सहकार क्षेत्रात निर्माण केला आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून राज्यात एक वेगळा दबदबा सहकारात निर्माण करण्यात यश आले आहे. सहकारातला पैसा सहकारातच राहिला पाहिजे. पतपेढी चालविणे सोपे नाही. मात्र, सहयोग संस्थेची वाटचाल चांगल्या पद्धतीने आहे. शून्यातून निर्माण केलेली संस्था एक वेगळ्या उंचीवर असल्याचा आनंद आहे. राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सहकार वाढविण्यावर भर द्या. पुढील काळात शंभर कोटींच्यावर संस्था होईल, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
सहयोग व्यापारी नागरी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव
अलिबागमधील सहयोग व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था 2000 मध्ये सुरु झाली. गोरगरीबांसह लघु उद्योग निर्माण करणाऱ्यांना आर्थिक बळ देण्याचे काम संस्थेने केले. 25 वर्षांत एक वेगळ्या उंचीवर संस्था पोहोचली आहे. संस्थेमध्ये सुमारे 50 कोटी ठेवी असून, या आर्थिक वर्षाच्या निव्वळ नफ्यातून 15 टक्के आणि मागील तीन वर्षांच्या रौप्य महोत्सव निधीतून अतिरिक्त प्रोत्साहनपर 10 टक्के असा 25 टक्के लाभांश देणारी महाराष्ट्रातील पहिली पतसंस्था असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. या संस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा झाला.






