| तळा | प्रतिनिधी |
तळा नगरपंचायत हद्दीत तहसील रस्त्यावरील धरणाच्या बाजूला मंजूर झालेल्या शासकीय विश्रामगृहाचे काम संथ गतीने सुरू असून, हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
तळा येथे शासकीय विश्रामगृह बांधण्यासाठी राज्य सरकारने 3 कोटी 14 लाख 54 हजारांचा निधी मंजूर केला आहे. बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी हा दिड वर्षांचा असून, या मंजूर कामाच्या बांधकामास सुरवात होऊन जवळपास एक वर्ष पूर्ण होत आला असूनही केवळ कॉलम भरण्याचे काम करण्यात आले आहे. सदर काम संथगतीने सुरू असल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
तळा तालुका हा दुर्गम तालुका म्हणून ओळखला जातो.1999 ला निर्मिती झालेल्या तळा तालुक्याला मात्र अद्यापही शासकीय विश्राम गृह नाही. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटक व नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तालुक्याचा इतिहास हा छत्रपती शिवाजी महाराजांपासूनचा आहे. तालुक्यात कुडे लेणी, तळगड किल्ला, वावेहवेली धरण अशा निसर्गाचा मोठा साठा आहे. त्यामुळे येथे विविध पर्यटक, इतिहासकार व तज्ञ मंडळी अभ्यासासाठी येत असतात. त्याचबरोबर मंत्री महोदयांच्या भेटी तालुक्याला होतात. विविध अधिकारी, पदाधिकारी यांच्या तळ्याच्या विकासाच्या दृष्टीने भेटी होत असतात. शासकीय वस्तीची प्रशिक्षणे अशा विविध दृष्टीने तळा तालुक्यात शासकीय विश्राम गृहाची गरज भासते. शासकीय विश्रामगृह नसल्याने अनेक अधिकारी, पर्यटक तसेच मंत्री महोदय यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने तळा शासकीय विश्रामगृहाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी जोर धरत आहे.







