पनवेल आगारातील सुविधांची कामे 15 दिवसात सुरू होणार

पनवेल प्रवासी संघाच्या लढ्यास अंशतः यश
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल एसटी स्थानकातील प्रवासी नागरिकांना भेडसावणार्‍या असुविधांचा धांडोळा घेण्याच्या उद्देशाने उपमहाप्रबंधक विद्या भिलारकर यांनी स्थानकाचा दौरा केला. पायाभूत सुविधांची वानवा पाहता आगामी पंधरा दिवसात सारी कामे सुरू झाली पाहिजेत असे त्यांनी सदरचा प्रकल्प विकसित करणार्‍या मेसर्स पनवेल मास ट्रान्झिट प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीच्या पदाधिकार्‍यांना ठणकावले.

पनवेलच्या राज्य परिवहन मंडळाच्या स्थानकातील पुनर्बांधणीचा प्रकल्प तब्बल 14 वर्षे उलटून गेल्यानंतरही प्रत्यक्ष कामास सुरुवात होत नसल्याचे पाहून पनवेल प्रवसी संघाने आंदोलनाचे संविधानिक हत्यार उपसले. या आंदोलनाचे फलित म्हणून नोव्हेंबर महिन्यातील दुसर्‍या आठवड्यात महामंडळाच्या उपमहाप्रबंधक (बांधकाम) यांच्यासमवेत पनवेल प्रवासी संघाचे शिष्टमंडळ आणि विकसकाचे पदाधिकारी यांच्या दरम्यान बैठक झाली. पुनर्बांधणी प्रकल्प अद्यापही अनुमत्यांच्या जंजाळात फसला असल्याचे या बैठकीत निष्पन्न झाले. परंतु तोपर्यंत नागरिकांना किमान सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी पनवेल प्रवासी संघाने आग्रही भूमिका घेतली. सदरच्या बैठकीत ठरल्या प्रमाणे पनवेल एसटी स्थानकाचा विद्या भिलारकर यांनी पाहाणी दौरा केला होता.

यामध्ये आवाराच्या आतील सार्‍या रस्त्यांची डागडुजी करून आवार खड्डे मुक्त ठेवणे, जेथे निवारा शेड नाहीत तिथे त्या बांधणे, आगारातील अस्ताव्यस्त वाढलेली झाडी झुडपे यांची छटाई करून हा परिसर स्वच्छ ठेवणे, दोन शौचालयांची तातडीने स्वच्छता करून ती सातत्याने स्वच्छ ठेवणे. बस गाड्यांचे मार्ग आणि वेळापत्रक यांचा माहिती फलक आवारात दर्शनी भागात लावणे अशी महत्वाची कामे आगामी 15 दिवसांत सुरू होणार आहेत.

विद्या भिलारकर यांनी केलेल्या पाहाणी दौर्‍याचे वेळी त्यांच्या समवेत विभागीय अभियंता विजय सावंत, पनवेल प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर भक्ती कुमार दवे, सचिव श्रीकांत बापट, सदस्य रमेश जानोरकर, निलेश जोशी, गौतम अगरवाल आदी मान्यवरांच्या समवेत संबंधित एस टी कर्मचारी उपस्थित होते.

गेले गावडे कुणीकडे?
पनवेल आगाराचे प्रमुख व्यवस्थापक गावडे यांना खरे तर मुंबई सेंट्रल येथील बैठकीस उपस्थित राहणे अभिप्रेत होते. काही कारणास्तव ते बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे पाहणी दौर्‍याच्या वेळेस देखील ते अनुपस्थित होते. त्यामुळे प्रवाशांच्यात गेले गावडे कुणीकडे? असे प्रश्‍न उमटत आहेत.

पायाभूत सुविधांची कामे सुरू होत असल्याचे समाधान असले तरी देखील राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल स्थानकातील पुनर्बांधणी प्रकल्प संपूर्ण झाला पाहिजे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून निकराचे प्रयत्न करत आहोत. राज्य परिवहन मंडळ हे राज्य शासनाच्या अधिपत्याखाली असल्याने या मंडळाचे नुकसान हे पर्यायाने राज्य सरकारचे नुकसान आहे. त्यामुळे अगोदरच रखडलेला हा प्रकल्प अनुमत्यांच्या जंजाळात अडकू नये, यासाठी राज्य शासनाने आवश्यक त्या अनुमत्या तातडीने मिळण्यासंदर्भात पावले उचलली पाहिजेत. पनवेल महानगरपालिका, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळ, पर्यावरण खाते आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या अनुमत्या महत्त्वाच्या असणार आहेत. त्या मिळविण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न केले पाहिजेत, अशा स्वरूपाचे पत्र संघटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिणार आहे.

डॉ. भक्तिकुमार दवे, अध्यक्ष, प्रवासी संघ
Exit mobile version