शेतकर्‍यांची चिंता मिटली

कर्जत तालुक्यात खत उपलब्ध

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात मागील 20 दिवसांपासून भातशेतीसाठी आवश्यक असलेल्या खतांचा तुटवडा जाणवत होता. त्यामुळे शेतकरी शेजारच्या तालुक्यात जाऊन चढ्या भावाने खताची खरेदी करीत होते. मात्र, शेतकर्‍यांच्या मागणीनंतर आता कर्जत खरेदी विक्री संघ आणि कळंब येथे सहकारी संस्थांमध्ये खताचा साठा उपलब्ध झाला आहे. मात्र, अजूनही कर्जत तालुक्यासाठी 150 ते 200 टन खताची गरज असल्याची माहिती कर्जत खरेदी विक्री संघाने दिली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी भाताचे क्षेत्र यावर्षीच्या खरीप हंगामात वाढले आहे. यावर्षी तब्बल 200 हेक्टर जमिनीवर भाताची शेती अधिक प्रमाणात शेतकर्‍यांकडून करण्यात आली आहे. यावर्षी 9500 हेटकरी जमिनीवर भाताची शेती करण्यात आली असून, शेतकरी युरिया तसेच मिश्र खताचा वापर आपल्या शेतीमध्ये करीत असतात. यावर्षी भाताची लागवड क्षेत्र लक्षात घेता साधारण 1500 टन खताची आवश्यकता शेतकर्‍यांना आहे. मात्र, मागील 20 दिवस कर्जत तालुक्यात खताचा तुटवडा जाणवत आहे. श्रावण महिन्यात पावसाने उघडीप घेतल्याने शेतकर्‍यांनी भाताच्या शेतातील गवताची बेणणी करून घेतली आणि त्यामुळे शेतीत मोठ्या प्रमाणात खताची गरज निर्माण झाली. परंतु, कर्जत तालुक्यात खताची मुख्य पुरवठादार असलेल्या खरेदी विक्री संघ मध्ये देखील खताचा तुटवडा निर्माण झाला. त्यानंतर संपूर्ण तालुक्यात भातासाठी खताची गरज निर्माण झाली, मात्र खात कुठेही उपलब्ध नव्हते. त्यामुले कर्जत तालुक्यातील शेतकरी शेजारच्या मुरबाड आणि अंबरनाथ तालुक्यात जाऊन खत खरेदी करीत होते.

त्यासाठी कर्जत खरेदी विक्री संघ यांच्याकडून खताची मागणी केली जात होती. अखेर कर्जत येथे 16 ऑगस्ट रोजी खताच्या गाड्या पोहोचल्या असून, त्यातील एक गाडी कर्जत येथून कळंब येथे पोहोचली आहे. मात्र, शेतकर्‍यांची गरज लक्षात घेऊन काही दुकानदार हे पूर्ण गोणी विकत नव्हते तर किलो किलो करून खात विकून मलिदा लाटण्याचा प्रयत्न करीत होते. शेवटी शेतकर्‍यांनी आक्रमक भूमिका घेतल्यावर खताच्या गोणी विकण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, अजूनही कर्जत तालुक्यासाठी 200 टन खताची मागणी आहे आणि त्यासाठी कृषी खरेदी विक्री संघाकडून मागणी नोंदवण्यात आली असल्याची माहिती खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक केतन खडे यांनी दिली आहे.

Exit mobile version