| वावोशी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यात छत्तिशी विभागातील डोणवत धरणात एका 26 वर्षीय युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना (दि.14) जुलै रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. तीन दिवसांपासून सतत पडत असलेल्या अतिवृष्टीने डोणवत धरण तुडुंब भरले असून, या ठिकाणी हा व्यक्ती पोहण्यासाठी आला होता. परंतु, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
ही घटना समजताच वावोशी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार निलेश सोनवणे, गिरीश नगरकर, विकास शिंदे, अपघातग्रस्तांची टीम, स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने सदरील मृतदेह पाण्याच्या बाहेर काढण्यात आला. यावेळी वावोशीचे मंडळ अधिकारी सचिन वाघ, डोणवतच्या पोलीस पाटील ऋषाली मोरे, तलाठी अंजना मावळकर यांनी या ठिकाणी उपस्थित राहून मृत व्यक्तीचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह खालापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आला. मृत व्यक्तीचे नाव उमेश चव्हाण असे असून, तो मूळचा उत्तर प्रदेश येथील राहणारा आहे. तो कामानिमित्त पूर्वीची उत्तम स्टील व आताच्या एमएनएस प्रा.लि. कंपनीत कंत्राटी स्वरूपात नोकरीला होता. या व्यक्तीचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले असल्याचे समजत आहे.