। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर शहरातून अंडरपासच्या खंदकातून जात असताना सर्व्हिसरोडवरून पादचारी कोसळण्याची शक्यता मोठया प्रमाणात निर्माण झाली आहे. मंगळवारी रात्री चांभारगणी येथील एक तरूण तोल जाऊन अंडरपासच्या खंदकात कोसळल्यानंतर सुदैवाने अंडरपासमधील वाहतूक अद्याप सुरू झाली नसल्याने तरूण वाचला. मात्र, संभाव्य धोक्याची घंटा आधीच वाजल्याने तालुक्यात तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. अरुण मोरवणकर हा कशेडी घाटातील चोळई येथील हॉटेल सायली ढाबा गार्डनमधील कर्मचारी पोलादपूर एसटी स्टँडकडे चालत येताना खणलेल्या अंडरपासमध्ये घसरून कोसळला. त्याला मुकामार लागलेल्या अवस्थेत पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.