| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यातील मौजे खांबवली येथील महेश विष्णू हिलम (28)हा गेल्या दिड महिन्यापासून बेपत्ता झाला आहे. तो अद्यापही सापडलेला नाही. बुधवारी 9 जुलै रोजी महेश विष्णू हिलम हा सुनिल जाधव उर्फ प्रकाश याच्यासोबत पुणे शहरातील पौंड येथे लावणीच्या कामासाठी गेला होता. तेथे त्याची तब्बेत ठीक वाटत नसल्याने तो 10 जुलै रोजी घरी येत असल्याचे सुनिल जाधव याने त्याच्या घरी फोन करून सांगितले. मात्र, त्या दिवशी तो घरी परतला नाही म्हणून दुसऱ्या दिवशी महेश हिलम च्या घरच्यांनी पुणे येथे दोन दिवस महेशचा शोध घेत होते. मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागत नसल्याने पौंड पोलीस ठाणे येथे तो हरवल्याची तक्रार दाखल केली.
त्यावेळी तेथील एका पत्रकाराला महेश जखमी अवस्थेत सापडला व त्याने त्याला सुरुवातीस पौंड प्राथमिक आरोग्य केंद्रात व त्यानंतर ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची माहिती दिली. नातेवाईकांनी पोलिसांसह तात्काळ ससून रुग्णालय गाठून तेथे चौकशी केली असता तुमचा मुलगा हॉस्पिटलमधून पळून गेला असल्याचे तेथील कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले व महेशबाबत सविस्तर माहिती देण्यास टाळाटाळ केली. या घटनेला दिड महिन्यांचा कालावधी उलटत आला तरी अद्यापही आपला मुलगा सापडला नसल्याने महेशचे आईवडील व नातेवाईकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे