सोशल मिडीयाच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग
। खोपोली । प्रतिनिधी ।
साधारणपणे सन 2007 नंतरच्या काळापासून खालापूर तालुक्यातील शेतकर्यांनी शेती व्यवसायाकडे पाठ फिरवायला सुरुवात केली होती. याची कारणे अनेक असली तरी यातील मुख्य कारण शेती व्यावसायासाठी लागणारे शेतमजूर मिळणे कठीण झाले आहे. सोबत पावसाच्या अनिश्चितते सोबत अवकाळी पडणारा पाऊस, तालुक्यातील झपाट्याने पसरलेले औद्योगिकीकरण, शेती विकून आलेला अमाप पैसा या अशा अनेक गोष्टींमुळे शेतकरी शेती व्यवसायापासून दूर झालेला दिसत होता. मात्र मागील 10 ते 12 वर्षापासून तालुक्यातील औद्योगिक वसाहतींमधील कामगार कपात असेल किंवा शेती विकून आलेला पैसा संपला असेल किंवा खूप शिकून सुध्दा नोकरी मिळत नसले आणि मिळालीच तर त्यातून मिळणारा पगार तुटपुंज्या स्वरूपाचा असेल या आणि अन्य कारणाने नोकरी, उद्योग, व्यवसायाला जोड म्हणून तरूण शेतकरी वर्ग आता शेतीकडे वळायला लागल्याचे एक छान आणि सुंदर प्रगतशील भारताचे चित्र उभे राहत असल्याने अनेत वयोवृद्ध शेतकर्यांना आपल्या शेवटच्या काळात तरी समाधान वाटत आहे.
खालापूर तालुका हा शेतीप्रधान आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला तालुका म्हणून संपूर्ण रायगड जिल्ह्यात गणला जायचा. तालुक्यातील बारमाही वाहणारी पाताळगंगा आणि बालगंगा या दोन नद्यांच्या पाण्यामुळे तालुक्यातील शेती बारमाही बहरलेली पहायला मिळत होती. डोंगराच्या पायथ्यापासून ते नदीच्या काटापर्यंत या दोन नद्यांच्या पाण्यावर दुबार भात शेती, मळे केले जात होते. यामुळे बांदावरील झाडांची हरियाली आणि पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत्र कायम चालू राहायचे यामुळे तालुक्यातील डोंगर माथ्यावर राहणार्या वाड्या वस्त्यांव्यतीरिक्त कुठेही पाणीटंचाई जाणवत नव्हती.
मात्र सन 2007 नंतर शेतकर्यांनी एकामागोमाग एक असे बहुतांश शेतकर्यांनी शेती करणे सोडल्याने त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्याचे पहायला मिळते. तालुक्यातील सुशिक्षित तरूण वर्ग सोशल मिडीयाच्या माध्यमातून खानाव गावचे तरुण शेतकरी मंगेश धामनसे,प्रसाद पाटील आणि त्यांचे सहकारी मित्र यांनी एकत्र येत खालापूर शेतकरी प्रतिष्ठान ग्रुपची स्थापना करून तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील(250) तरूणांना यात सहभागी करून घेत आप-आपल्या शेतात, परसात किंवा शेतघराच्या परिसरात जे पिक घेता येईल ते कसे घेता येईल. कोणाला पिका संदर्भात माहिती किंवा आपण केलेला यशस्वी प्रयोगाची माहिती ही या ग्रुपच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहचविली जात असल्याने तरूणांचा उत्साह वाढलेला दिसत आहे. या ग्रुपचा सर्वात मोठा फायदा तयार मालाला लगेच बाजारपेठ उपलब्ध होत आहे. तालुक्यातील तरूणांनी खालापूर तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली वाल, वाटाणा, भाजीपाला, आंबे तसेच वेलवर्गीय भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. त्यांचा तयार माल शेताच्या बांधावरच विकला जात असल्याने पुढील काळात तालुक्यातील अन्य तरूणही शेती व्यवसायाकडे वळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.







