पारंपारिक खेळाचा क्रेझ आजही गावागावात
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शाळांना सुट्टी पडली आहे. त्यामुळे अनेक गावांमधील तरुणाई वेगवेगळ्या खेळामध्ये रमू लागली आहे. त्यामध्ये पारंपारिक गोेट्यांच्या खेळांचा क्रेझ आजही मोबाईलच्या जगतामध्ये टिकून असल्याचे दिसून आले आहे.
दहा ते पंधरा वर्षापुर्वी शाळेला सुट्टी पडल्यावर अनेक मुले गल्ली, अंगणात गोट्यांचा खेळ खेळत असत. त्यामुळे सकाळी व संध्याकाळच्या वेळेला हा परिसर बच्चे कंपनीने फुलून जात होता. मात्र, गेल्या काही वर्षापासून हा खेळ कालबाह्य होण्याच्या मार्गावर होता. मोबाईलमध्ये वेगवेगळे खेळ असल्याने अनेक बच्चे कंपनी सुट्टीमध्ये मोबाईलवरच पपजी, फ्रि फायर सारखे खेळ खेळण्यामध्ये मग्न असत. त्यामुळे गल्ली व अंगणातील मुलांचा किलबिलाट नाहीसा होऊ लागला होता. परंतु, गोट्या खेळाला पुन्हा नवसंजीवनी मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्यानंतर शाळेतील अनेक मुलांना सुट्टी पडली आहे. सुट्टीचा आनंद घालविण्यासाठी काही मुले क्रिकेट खेळ खेळत आहेत. काही मुले आयपीएल क्रिकेट स्पर्धा बघण्यामध्ये मग्न असल्याचे दिसून येत आहे. पण जिल्ह्यातील काही गावांमधील मुले पारंपारिक खेळ गोट्या खेळत असल्याचे दिसून आले आहे. दोन गट निर्माण करून गोट्या खेळण्याचा खेळ ठिकठिकाणी खेळत असल्याचे पहावयास मिळत आहे. हा खेळ पुन्हा बहरण्याच्या मार्गावर आहे.
गोट्या हा पारंपारिक खेळ आहे. पुर्वी हा खेळ गावात मोठ्या प्रमाणात खेळला जात होता. मात्र, मोबाईलमुळे या खेळाकडे दुर्लक्ष झाले होते. पुन्हा एकदा हा खेळ उन्हाळी सुट्टीत खेळण्यास सुरुवात झाली आहे. एकाग्रता निर्माण करण्याबरोबरच एकत्र राहण्याची शिकवण या खेळातून मिळत आहे.
दयानंद पाटील, महाजने







