महाजने गावातील तरुणांनी जपली परंपरा
| अलिबाग | प्रमोद जाधव |
अलिबाग तालुक्यातील महाजने निसर्गाच्या सानिध्यात वसलेले गाव आहे. एकतेचे प्रतिक म्हणून या गावाकडे पाहिले जाते. गुण्यागोविंदाने या गावात सण, उत्सव साजरे केले जातात. कोकणातून उगम पावलेल्या बाल्या नृत्याची परंपरा आजही रायगड जिल्ह्यातील महाजने ग्रामस्थ मंडळाच्या वतीने जपण्याचा प्रयत्न केला आहे. श्रमातून निर्माण केलेल्या श्रमिक नाच मंडळाने सुवर्ण महोत्सवाकडे पाऊल टाकले आहे. विशिष्ट वयोगटातील मंडळी सहभागी असणाऱ्या बाल्या नृत्यामध्ये (जाखडी) तरुणाईदेखील सहभागी होत असल्याचे चित्र शनिवारी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने दिसून आले.

कृष्णजन्माष्टमीनंतर गोपाळकाळानिमित्त बाल्या तथा जाखडी नृत्याचे सादरीकरण केले जाते. या दिवसापासूनच बाल्या नृत्याला सुरुवात होते. त्यानंतर गणेशोत्सवात बाल्या नृत्य ठिकठिकाणी घेतले जातात. कोकणच्या जाखडी नृत्याला एक वैशिष्टपूर्ण असा ठेका आहे. जाखडीला साथ देणारे, गण, गवळण गाणारे मध्यभागी एकत्र बसतात. वैशिष्टपूर्ण रंगीबेरंगी कपडे घालत जाखडी नृत्य करणारे त्यांच्या भोवती फेर धरून नाचतात. ढोलकीवर थाप पडताच नृत्याच्या पहिल्या कलावंताचा प्रवेश होतो. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातून सुरु झालेला जाखडी नृत्य आपल्या गावातदेखील सुरु व्हावे, म्हणून महाजने गावांतील काही मंडळींनी पुढाकार घेतला. त्यावेळी श्रमदानातून ढोलकी व इतर साहित्य घेऊन श्रमिक नाच मंडळ सुरु केले. संगीत नाचाबरोबरच जाखडी नृत्याचा सराव सुरू केला. शिवकुमार पारंगे, राजाराम पारंगे, सूनील पारंगे, प्रभाकर पारंगे, यशवंत पारंगे, सहदेव पारंगे, जयवंत पारंगे, जयराम पाटील, रविंद्र पाटील, विलास भोनकर, हरिश्चंद्र पाटील, अनंत औचटकर, नारायण भोनकर यांच्यापासून बाल्या नृत्याची सुरुवात 50 वर्षापूर्वी झाली.

दरवर्षी गोपाळकाळानिमित्त बाल्या नृत्याला सुरुवात केली जाते. गण, गवळण घेत नृत्याचे सादरीकरण केले जाते. ही परंपरा आजही जपण्याचे काम मंडळाने केले आहे. हळूहळू या श्रमिक नाच मंडळामध्ये तरुण मंडळीदेखील सहभागी होऊ लागली. विनोद भोनकर यांच्या ढोलकीच्या ठेक्यावर अनेकांचे पाय थिरकले जात आहेत. विनायक भोनकर यांनीदेखील बुवा म्हणून भूमिका बजावली आहे. सध्या या श्रमिक नाच मंडळामध्ये सचिन पारंगे, जयदास पारंगे बुवा म्हणून आहेत. संजय पारंगेसह समिर पाटील, मनोज औचटकर, मनिष औचटकर यांचादेखील सहभाग असल्याचे चित्र दिसून आले आहे. श्रमिक नाच मंडळाने 50 वर्षाची परंपरा जपली आहे.
कोळी गीताच्या ठेक्यावर नृत्य सादरीकरण
रायगड जिल्ह्यामध्ये कृष्ण जन्माष्टमीनंतर शनिवारी (दि. 16) गोपाळकाळा सण साजरा करण्यात आला. या निमित्ताने अलिबाग तालुक्यातील महाजने येथे श्रमिक नाच मंडळाच्या वतीने जाखडी नृत्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी कोळ्यांचा पेहराव करण्यात आला. बेंजोमार्फत लावण्यात आलेल्या कोळी गीताच्या ठेक्यावर कलावतांनी नृत्याचे सादरीकरण केले. एक वेगळा उत्साह या निमित्ताने पहावयास मिळाला. महाजनाई देवीच्या मंदिराच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला.







