रेवदंड्यातील तरुणाई बरबादीच्या मार्गावर

| रेवदंडा | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग आणि मुरुड तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यातील तरुणांमध्ये अमली पदार्थांचे वाढते प्रमाण ही गंभीर चिंतेची बाब बनली आहे. विशेष म्हणजे 20 ते 25 वयोगटातील युवापिढी या व्यसनाच्या जाळ्यात अडकताना दिसत असल्याने सामाजिक चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, रेवदंडा परिसरात गांजा खुलेआम उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी नागरिकांमधून सातत्याने पुढे येत आहेत. काही तरुण उच्चभ्रू कुटुंबांतील असून, काहीजण सर्वसामान्य संगती, मैत्री आणि वाईट सवयींच्या प्रभावातून व्यसनाधीन झाल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. अनेकदा वडिलांच्या चारचाकी गाडीतूनच ‌‘दम मारो दम’सारखे प्रकार सुरू असल्याची कुजबुजही नागरिकांमध्ये ऐकू येत आहे. या व्यसनाचा परिणाम केवळ व्यक्तीपुरता मर्यादित राहत नसून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे. तरुण वयातच व्यसन लागल्याने त्याचे गंभीर परिणाम त्यांच्या शिक्षण, नोकरी, आरोग्य आणि कुटुंबजीवन या सगळ्यांवर होत आहे. रेवदंड्यातून व्यसनमुक्तीचे कार्य करणाऱ्यांकडून देशभर जागृती केली जाते, तरीही आपल्या भागातच तरुण पिढी व्यसनाच्या गर्तेत जात असल्याने हा विरोधाभास अधिक बोचरा वाटत आहे. इतरांना व्यसनमुक्तीचा संदेश देणारा परिसरच आज व्यसनांच्या विळख्यात सापडतो आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिकांतून उमटत आहे.

Exit mobile version