| पेण | प्रतिनिधी |
मुंबईचा विचार केला तर आगरी-कोळी मराठी माणूस हा येथील मूल रहिवासी, मात्र बदलत्या काळाच्या प्रवाहात हा माणूस मुंबईमधून हद्दपार झाला आहे. या धर्तीवर आज नवी मुंबई तिसरी मुंबई येऊ घातलेली आहे. त्या नव्या बदलात आज येथील जमिनी घेतल्या जात असून, येथील स्थानिक आगरी-कोळी मराठी माणूस हद्दपार होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. या आगरी-कोळी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी व्यापक दूरदृष्टी असलेल्या तरुणांनी, उच्चशिक्षित वर्गाने पुढे येऊन समाजात काम करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामागर पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी केले.
माजी खासदार बॅ. ए.टी. पाटील यांच्या 101व्या जयंतीनिमित्त अतुल नंदकुमार म्हात्रे प्रतिष्ठान यांच्यावतीने पेण येथील आगरी समाज हाल येथे बॅ. ए.टी. पाटील जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमासाठी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, डॉ. सिद्धार्थ पाटील, शेकापचे माजी नगरसेवक अजित सालुके, प्रकाश शिगरुत, पेण पं.स.चे माजी सभापती महादेव दिवेकर, चंद्रकात पाटील, काँग्रेस नेत्या नंदा म्हात्रे, सूर्यकांत पाटील, अॅड. रोशन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जयंत पाटील म्हणाले की, गेली 40 वर्षे राज्याच्या विधिमंडळात गरीब, कष्टकरी, शेतकरी वर्गाच्या भल्यासाठी आपण कायदे करीत आहोत. आजकालच्या ओघात हा वर्ग संकटात सापडला आहे. या वर्गाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. अशा माणसांना स्वाभिमानाने उभे करण्यासाठी बॅ. ए.टी. पाटील यांनी अव्याहतपणे काम केले, ते काम पुढे नेण्यासाठी समाजातील तरुणांनी, उच्च शिक्षित वर्गाने पुढे येऊन काम करण्याची गरज आहे. अतुल म्हात्रेंसारखा व्यापक दूरदृष्टी असलेला तरूण आज हे काम करत आहे, ही समाधानाची बाब आहे. नवी दृष्टी असलेले असे तरुणच या समाजाला नवी दिशा देऊ शकतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी सूर्यकांत पाटील यांनी बॅ. ए.टी पाटील यांच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला.तर, डॉ. सिद्धार्थ पाटील यांनी आपल्या वडिलांच्या विचारांची थोरवी विशद करताना अनेक आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाच्या शेवटी अतुल म्हात्रे यांनी बॅ. ए.टी. पाटील यांचे समाजासाठीचे कार्य किती मोठे आहे हे सांगून आज ते पुढे नेण्याची गरज असल्याचे सांगितले. आज येथील लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या प्रश्नाची कायमची सोडवणूक करून येथील शेतकरी संपन्न कसा होईल यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन काम करणे आवश्यक असल्याचे सांगितले.