| पोलादपूर | प्रतिनिधी |
बीकेसीवरील दसरा मेळाव्यासाठी गेलेल्या कापडे बुंद्रुक येथील शिवसेना कार्यालय सांभाळणारा तरूण बेपत्ता होऊन एका आठवडयाचा कालावधी उलटूनही त्याचा शोध घेतला जात नसल्याने पंचक्रोशीमध्ये चिंता व्यक्त होत आहे. काहीसा मतिमंद असलेला गणेश सुंदर सकपाळ याला वडिलांच्या मृत्यूनंतर आई आणि दोन भाऊ असे कुटूंब आहे. या दोन भावांपैकी एक मुंबईमध्ये नोकरी करून उदरनिर्वाह करीत असून दुसरा कापडे येथे शेती करतो.
गणेशला उदरनिर्वाहासाठी कापडे येथील नाक्यावरील दुकानांमध्ये साफसफाई करून दुकानदार देतील तो मोबदला स्विकारावा लागत असे तर भाजीच्या दुकानामध्ये भाजी साफ करण्यासह आजूबाजूच्या दुकानदारांनी सांगितलेली कामं करण्याचा कल असलेल्या गणेशला कापडे नाक्यावरील शिवसेनेच्या कार्यालयामध्येही साफसफाई करताना रोज अनेकांनी बघितले आहे. कोणी चहा आणायला सांगितले अथवा कधी हॉटेलमध्येच काम असेल तर गणेश जे काम मिळेल ते करीत असायचा. दसर्याच्या दिवशी सकाळी कापडे नाक्यावरील दुकानदारांची कामे आटोपून गणेश सकपाळ शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जाण्यासाठी खासगी लक्झरी बसमधून बीकेसीकडे रवाना झाला. मात्र, बीकेसी मैदानावरील मेळावा संपल्यानंतर तो कोठे दिसेनासा झाला. मुंबईमध्ये काहीसा मतिमंद असलेल्या गणेशला नेल्यानंतर परत आणायची जबाबदारी पार पाडण्यात कसूर झाली अथवा कसे, याबाबत कोणासही काहीही माहिती नाही. मात्र, दसरा मेळाव्यानंतर आजतागायत गणेश सकपाळ हा बेपत्ता असल्याने कापडे बुद्रुक नाक्यावर सर्वत्र चिंतेचे वातावरण पसरले आहे.
कापडे बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते रामदास सकपाळ यांनी गणेश सकपाळ याच्या शोधासाठी सर्वत्र सोशल मिडीयाद्वारे प्रयत्न केले. यामुळे काही न्यूजचॅनेलनेही गणेश बेपत्ता झाल्याचे वृत्त प्रसारित केले. आ.गोगावले यांनी गणेश सकपाळ याच्या बेपत्ता झाल्याच्या वृत्ताबाबत दुजोरा दिला असूनही आजतागायत कोणालाही गणेशचा शोध न लागल्याने काळजीचे ढग अधिकच गडद होऊ लागले आहेत.







