| उरण | प्रतिनिधी |
उरण शहर हादरवणाऱ्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करत उरण पोलिसांनी पुन्हा एकदा आपली धडाडी दाखवली आहे. येथील एका घरातून 96 हजार रुपयांचा मुद्देमाल दोन चोरट्यांनी लंपास केला होता. उरण पोलिसांनी त्यांचा मागोवा घेत त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. तसेच, त्यांच्याकडून इतर ठिकाणी केलेले चोरीचे गुन्हे उघडीस आणले असून मुद्देमाल जप्त केला आहे.
वाणी आळी येथे 15 सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास सुबोध अपन्ना राव (56) यांच्या घरात चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेतील दोन चोरट्यांनी सुबोध यांच्या घरातून गळ्यातील सोन्याची चेन व रोख रक्कम असा एकूण 96 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक राठोड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे अल्पावधीतच या गुन्ह्याचा पर्दाफाश करत आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून एकूण 86 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मोहित गोपाळ कोहली (26) व स्वप्नाली हरिश्चंद्र पाटील (26) यांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी तब्बल 11 जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.





