| पनवेल | वार्ताहर |
कळंबोली सेक्टर 11 मध्ये अज्ञात इसमाने मोबाईलच्या दुकानाचे शटर उघडून दुकानातून 10 डेमो मोबाईल, 2 ग्राहकांचे मोबाईल व 14 हजार रुपयांची रोकड असा एकूण 1 लाख 39 हजार 150 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
सुयश व्यवहारे यांचे कळंबोली सेक्टर 11 मध्ये मोबाईल प्लॅनेट नावाचे दुकान आहे. सुयश हे रात्री दुकान बंद करून घरी गेले असता अज्ञात इसमाने रात्रीच्या सुमारास त्यांच्या दुकानाचे शटर उघडून 1 लाख 39 हजार 150 रुपयांचा ऐवज लंपास केला. सुयश हे सकाळी दुकान उघडायला आल्यावर त्यांना दुकानाचे शटर विचित्र अवस्थेत आढळून आल्याने दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी कळंबोली पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, अशाप्रकारे दुकाने फोडण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. त्यामुळे चोरट्यांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.