| खोपोली | प्रतिनिधी |
खालापुर तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या कुंठेबाग येथे विद्युत मंडळाचे ट्रान्सफॉर्मर बसविले असून येथुनच या परिसरात विजेचा पुरवठा होतो. दरम्यान, सोमवारी (दि.15) रात्रीच्या सुमारास परिसराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी ट्रान्सफॉर्मरकडे धाव घेतली असता ट्रान्सफॉर्मर गायब झाल्याचे दिसून आले. याची माहिती तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सहाय्यक अभियंता प्रवीण शेटगे यांना माहिती दिली. तर, महावितरणचे कर्मचारी यांनी ट्रान्सफार्मरची तपासणी केली असता ऑईल व तांब्याची कॉईल चोरीला गेल्याचे लक्षात आले. याबाबत खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या ट्रान्सफॉर्मरमधून चक्क 160 लिटर ऑईल व 100 किलो तांबा चोरून नेले आहे. या चोरीत जवळपास 90 हजार रुपयाच्या मालाची चोरी झाली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी चालू ट्रान्सफार्मरमधून चोरी केल्याने सर्वजण अजब झाले आहेत. या घटनेचा पुढील अधिक तपास खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खालापुर पोलीस करत आहेत.
चालू ट्रान्सफॉर्मरमधून कॉइलची चोरी
