विकासकामांच्या साहित्यांची चोरी

। पोलादपूर । प्रतिनिधी ।
पोलादपूर तालुक्यात चौपदरीकरणासोबतच विविध विकासकामांची रेलचेल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निधीतून सुरू असताना स्टीलचोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विकासकामांची उघडउघड चोरी होत असल्याने या चोर्‍यांच्या घटनांना बाकी सब भंगार है, असे स्वरूप आले आहे. एल अ‍ॅन्ड टीसारख्या कंपन्यांदेखील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात स्टीलचे शिल्लक राहिलेले तुकडे चोरून नेण्यासाठी भंगारमाफियांशी संगनमत करीत असल्याचे दिसून आले आहे. लोहारमाळ येथे रस्त्यालगत पडलेला विजेचा जुना लोखंडी खांब ट्रकमधून बाहेर दिसणार नाही, एवढाच कापून ठेवताना एक व्यक्ती दिसून आल्याचा एक व्हिडीओ महावितरण अधिकार्‍यांना पाठवूनही त्याबाबत कोणतीही कारवाई केली गेली नाही.

तालुक्यातील दरीलगतचे क्रॅश बॅरियर्स दरीत ढकलून कालांतराने त्याची परस्पर वाहतूक करून विक्री करणे अथवा त्याच क्रॅश बॅरियर्सना चंदेरी रंग लावून ठेकेदाराला नवीन क्रॅश बॅरियर म्हणून विकणे आदी प्रकार सर्रासपणे घडताना दिसत आहेत. कशेडी घाटाला पर्यायी भुयारी राष्ट्रीय महामार्गाच्या कामातील बांधकाम साहित्याची चोरी होत असल्याचा पोटठेकेदार असलेल्या एसडीपीएल कंपनीला संशय आला होता. त्यावेळी पोलादपूर पोलीस ठाण्यास दिलेल्या तक्रारीनुसार गुप्तवार्ता विभागाने काढलेल्या माहितीवरून गुरांच्या गोठ्यांमध्ये चोरून आणलेले स्टील अज्ञात आरोपीने लपवून ठेवल्याचे आढळून आले.

पोलादपूर शहरातील सैनिकनगर येथे सध्या वास्तव्यास असलेल्या प्रदीप तुकाराम चव्हाण (वय 36, जळगांवरोड, ता.जि.औरंगाबाद) यांनी कशेडी घाटाला पर्यायी भुयारी राष्ट्रीय महामार्गाच्या कामातून बांधकामाच्या साहित्याची सातत्याने चोरी होत असल्याची तक्रार पोलादपूर पोलीस ठाण्याला दिली होती. यामध्ये 25 मी.मी. जाडीचे बांधकामाच्या जुन्या वापरत्या स्टीलचे तुकडे अंदाजे 250 कि.ग्रॅ. वजनाचे किंमत अंदाजे 15 हजार रूपये आणि 32 मी.मी. जाडीचे जुन्या वापरत्या स्टीलचे अंदाजे 350 कि.ग्रॅ. वजनाचे तुकडे यामुळे हे बांधकाम साहित्य हस्तगत करण्याचे आव्हान पोलादपूर पोलीसांसमोर होते. यावेळी गुप्तवार्ता विभागाने या बांधकाम साहित्याच्या चोरीवर बारकाईने लक्ष ठेवले असता भुयारी महामार्गाचे काम सुरू असलेल्या भोगाव गावाच्या हद्दीत एका गोठयामध्ये अंदाजे 36 हजार रूपये किंमतीचे हा बांधकाम साहित्यातील जुने वापरते स्टील हस्तगत केले.

पार्टेकोंड ते सावंतकोंड दरम्यानचा एक लोखंडी पूल चार दिवसांपूर्वी चोरीला गेल्याची तक्रार नगरपंचायतीकडून पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्यानंतर रात्रीच्या अंधारात काही अज्ञात व्यक्तींनी याच पुलाच्या ठिकाणी या पुलाचे अवशेष आणून टाकले आहेत. पोलादपूर नगरपंचायतीच्या ताब्यातील सावंतकोंड, पार्टेकोंड प्रभाग क्रमांक 1 मध्ये नळपाणीपुरवठा करण्याची पाईपलाईन चोरीला गेल्याची तक्रार काँग्रेस शहर अध्यक्ष अमोल भुवड यांनी पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे दिली आहे. पोलादपूर तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यालगतच्या रेलिंगचे कठडे, पुलाचे कठडे, लोखंडी पूल, स्मशानाचे आयबीम लोखंडी खांब, वादळामुळे कोसळलेले विजेचे लोखंडी खांब आदी विकास कामांशी निगडीत वस्तुंची भंगार माफियांनी सर्रास चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून याबाबत प्रशासनाकडून फारसे गांभिर्याने पाहिले जात नाही.

Exit mobile version