सव्वाबारा लाखांच्या औषधांची चोरी

। पनवेल । वार्ताहर ।
आर्थिक फायद्यासाठी 12 लाख 24 हजार रुपयांच्या औषधांची चोरी केल्याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश कुमार चौधरी यांचा वैद्यकीय औषधे विकण्यासाठी कुबेर फर्मान सर्जिकल नावाने सेक्टर 21, कामोठे येथे गाळे आहेत. त्यासाठी त्यांनी पाच मुले कामावर ठेवलेली आहेत. ते त्यांच्या गावी राजस्थान येथे गेले असताना नथुराम सोनाराम चौधरी हा ग्राहकांच्या मागणीप्रमाणे औषधे पोहोच करून त्यांच्याकडून धनादेशाद्वारे रोखीने पैसे घेऊन बँकेत जमा करत होता. सुरेश कुमार यांचा अपघात झाल्याने ते बरेच दिवस दुकानांमध्ये गेले नव्हते. त्यांनी दुकानातील जमा असलेला माल व बँक अकाऊंटमध्ये जमा असलेली रक्कम व येणारी उधारी या सर्वांचा ताळमेळ लावण्याचा प्रयत्न केला असता 12 लाख 24 हजार 251 रुपये रकमेची तफावत आढळून आले. त्यामध्ये सहा लाख 63 हजार रुपये रकमेचे औषधे चोरीस गेल्याचे आणि पाच लाख 60 हजार रुपये रकमेची औषधे नोकर नथुराम चौधरी याने चोरून 28 ग्राहकांना 10 ते 15 टक्के सवलतीने माल विक्री केली. याप्रकरणी नथुराम सोनाराम चौधरी राहणार (जालोर राजस्थान) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version